Ladaki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला असून, त्यामुळे अनेक महिलांचा श्वास आता मोकळा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, जानेवारी २०२६ मध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र अनेक महिलांना विविध अडचणींमुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आलेली नाही. सुरुवातीला केवायसीसाठी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली होती, परंतु कमी कालावधीत सर्व महिलांना केवायसी करणे शक्य नसल्याने शासनाने ही मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली.
तरीही राज्यातील मोठ्या प्रमाणावर महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याचे समोर आले. अंदाजे ४५ लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे. यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर शासनाने महिलांची अडचण लक्षात घेत केवायसी प्रक्रियेस आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता लाडक्या बहिणींना ३० जानेवारी २०२६ पर्यंत केवायसी करण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. Ladaki Bahin Yojana
यासोबतच शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पती आणि वडील दोन्हीही हयात नसलेल्या लाभार्थी महिलांसाठी स्वतंत्र माहिती संकलन करण्यासाठी एक खास संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या महिलांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शासनाने ही वेगळी व्यवस्था केली आहे.
दरम्यान, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यांची आतुरतेने प्रतीक्षा आहे. डिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप दोन्ही महिन्यांचे पैसे खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. मात्र महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, अजूनही सुमारे ३५ टक्के लाभार्थी महिलांची केवायसी बाकी आहे. त्यामुळेच केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, येत्या काही दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांची रक्कम जमा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
एकूणच, शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक महिलांच्या मनातील भीती आणि चिंता दूर होण्यास मदत झाली आहे. आता महिलांनी दिलेल्या मुदतीत केवायसी पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवणे गरजेचे आहे.