Marathwada Highway : मराठवाड्यासाठी अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि फक्त कागदांपुरताच मर्यादित राहिलेला लातूर, कल्याण महामार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने सरकला आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या महामार्ग प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर या प्रकल्पाबाबत एकामागोमाग एक महत्त्वाच्या अपडेट्स येऊ लागल्या आहेत. मुंबई ते लातूर हा प्रवास जलद, सोपा आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हा नवा द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. Marathwada Highway
कल्याण–लातूर ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्ग हा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असून, मराठवाड्याच्या एकात्मिक विकासासाठी हा महामार्ग गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या महामार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळणार आहे. राज्य सरकारकडून तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर एमएसआरडीसीने या महामार्गाच्या संरेखनाचे काम सल्लागारामार्फत सुरू केले असून, त्यामुळे आता प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकल्पाबाबत आतापर्यंत फक्त चर्चा होत होत्या. मात्र नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या महामार्गाचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरण पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले आणि विधानसभेत याची अधिकृत घोषणा देखील केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा महामार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येताना दिसत आहे.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे हा महामार्ग नेमका कोणत्या जिल्ह्यांतून आणि कोणत्या गावांमधून जाणार? सध्या उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा नवा लातूर–कल्याण महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांमधून जाणार असल्याची शक्यता आहे. प्रस्तावित मार्गानुसार हा महामार्ग उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा या भागांमधून जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र हे संरेखन अद्याप अंतिम नसूनएमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या जे संरेखन योग्य ठरेल, तेच अंतिम केले जाणार आहे. त्यामुळे अंतिम रूट जाहीर झाल्यानंतरच महामार्गाचा नक्की मार्ग अधिकृतपणे समोर येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातून हा महामार्ग जावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
धाराशीव जिल्ह्यातून हा महामार्ग जावा, यासाठी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. दुसरीकडे, बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या राजकीय हालचालींमुळे बीड आणि धाराशीव जिल्ह्यातील काही तालुक्यांतून हा महामार्ग जाण्याची शक्यता अधिक बळावली असल्याची चर्चा सुरू आहे.
एकूणच पाहता, लातूर–कल्याण द्रुतगती महामार्ग केवळ रस्ता नसून, मराठवाड्याच्या विकासाचा नवा मार्ग ठरणार आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदार वर्गासाठी हा महामार्ग वेळ, पैसा आणि कष्ट वाचवणारा ठरेल. आता फक्त सर्वांचे लक्ष अंतिम संरेखन आणि पुढील निर्णयांकडे लागले असून, लवकरच या प्रकल्पाबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.