Bharat Taxi App: गेल्या काही वर्षांपासून ओला आणि उबेर या दोन खासगी टॅक्सी कंपन्यांनी संपूर्ण टॅक्सी बाजारावर आपली पकड मजबूत केली आहे. प्रवाशांना कधी भाडेवाढीचा फटका, तर चालकांना जास्त कमिशनचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या दोघांच्या मक्तेदारीला थेट आव्हान देणारी एक नवी सरकारी पुढाकारातून येणारी सेवा लाँच होणार आहे.
केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाकडून १ जानेवारी २०२६ पासून ‘भारत टॅक्सी ॲप’ (Bharat Taxi App) सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे ॲप सहकारी तत्त्वावर (Cooperative Model) आधारित असणार असून, यामुळे टॅक्सी उद्योगात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘भारत टॅक्सी’ म्हणजे नेमकं काय?
‘भारत टॅक्सी’ हे कोणत्याही खासगी कंपनीचे ॲप नसून, चालकांच्या सहभागातून चालणारे सहकारी मॉडेल असणार आहे. म्हणजेच येथे चालक केवळ कामगार न राहता, थेट भागीदार असतील. याच गोष्टीमुळे हे ॲप ओला-उबेरपेक्षा वेगळं आणि अधिक लोकाभिमुख ठरण्याची शक्यता आहे. Bharat Taxi App
प्रवाशांसाठी दिलासादायक काय बदल होणार?
आज ओला-उबेर बुक करताना सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे अचानक वाढलेलं भाडं. पाऊस, गर्दी किंवा सणासुदीच्या काळात भाडे अक्षरशः दुप्पट-तिप्पट होतं. मात्र भारत टॅक्सीमध्ये ही समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
या ॲपमधून
- भाडे स्थिर आणि पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार
- ओला-उबेरच्या तुलनेत स्वस्त प्रवास मिळू शकतो
- सरकारी पाठबळ असल्यामुळे प्रवाशांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई होण्याची अपेक्षा आहे
- कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी असे विविध पर्याय एका ॲपमध्ये उपलब्ध असणार
सामान्य माणसाला रोजच्या प्रवासात थोडा तरी दिलासा मिळावा, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
टॅक्सी चालकांसाठी मोठा फायदा
आज अनेक चालक ओला-उबेरवर काम करताना नाराज आहेत. कारण २५ ते ३० टक्के कमिशन कापल्यानंतर हातात फारसं काही उरत नाही. याच मुद्द्यावर भारत टॅक्सीने थेट बोट ठेवलं आहे.
या नव्या ॲपमध्ये
- झिरो किंवा अत्यल्प कमिशन असण्याची शक्यता
- चालकांना त्यांच्या कमाईचा ८० ते १०० टक्के हिस्सा मिळू शकतो
- फक्त नाममात्र सबस्क्रिप्शन फी भरून काम करता येणार
- सहकारी मॉडेल असल्यामुळे चालक स्वतःच या व्यवस्थेचा भाग असतील
म्हणजेच “आपण कुणासाठी काम करतोय” यापेक्षा “आपल्या सिस्टिममध्ये काम करतोय” अशी भावना निर्माण होऊ शकते.
ओला-उबेरचा खेळ खरोखर संपणार का?
हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे. भारत टॅक्सीची सुरुवात दिल्ली-NCR मधून होणार असून, नंतर मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही सेवा विस्तारली जाणार आहे. मात्र हेही तितकंच खरं आहे की ओला-उबेरचं नेटवर्क खूप मोठं आहे. लाखो चालक आणि कोट्यवधी प्रवासी सध्या त्यांच्याशी जोडलेले आहेत. भारत टॅक्सीला यश मिळवायचं असेल, तर
- मोठ्या प्रमाणात चालक जोडावे लागतील
- ॲप तांत्रिकदृष्ट्या मजबूत ठेवावं लागेल
- सेवा वेळेवर आणि विश्वासार्ह द्यावी लागेल
जर हे सगळं जमलं, तर ओला-उबेरलाही आपले दर आणि कमिशन कमी करावे लागतील, अन्यथा ग्राहक दुसरा पर्याय निवडू शकतात.
थोडक्यात काय सांगायचं तर…
१ जानेवारी २०२६ पासून येणारा ‘भारत टॅक्सी’ हा फक्त एक ॲप नसून, टॅक्सी उद्योगातील एक नवा प्रयोग आहे. प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास, तर चालकांना सन्मानाचं आणि भरपूर उत्पन्न देण्याची आशा या माध्यमातून निर्माण झाली आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्यात “टॅक्सी म्हणजे लुट” ही भावना बदलून “टॅक्सी म्हणजे सोय” असं चित्र दिसू शकतं. आता फक्त पाहायचं इतकंच की भारत टॅक्सी रस्त्यावर उतरल्यावर खरंच ओला-उबेरची मक्तेदारी मोडीत काढते का.