FD scheme : आजच्या घडीला महागाई वाढतेय, खर्च वाढतोय आणि अशा परिस्थितीत मेहनतीने साठवलेला पैसा सुरक्षित ठेवत त्यावर चांगला परतावा मिळावा, हीच प्रत्येक मध्यमवर्गीयाची अपेक्षा असते. मात्र अलीकडच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केल्यामुळे गुंतवणूकदार थोडेसे संभ्रमात पडले होते. अशा वेळीही एक सरकारी बँक आजही खात्रीशीर आणि समाधानकारक परतावा देत असल्याने ही योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आरबीआयने 2025 मध्ये कर्जदारांना दिलासा देण्यासाठी रेपो रेटमध्ये मोठी कपात केली. याचा फायदा होम लोन, कार लोनसारख्या कर्जदारांना झाला असला, तरी एफडी करणाऱ्यांसाठी हा निर्णय थोडा तोट्याचा ठरला. कारण रेपो रेट कमी झाला की बँका एफडीचे व्याजदरही कमी करतात. त्यामुळे अनेक बँकांमध्ये फिक्स डिपॉझिटवर मिळणारे व्याज पूर्वीपेक्षा कमी झाले आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीतही सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या काही एफडी योजनांमध्ये अजूनही चांगले व्याजदर कायम ठेवले आहेत. FD scheme
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देशातील जुनी आणि विश्वासार्ह सरकारी बँक असून, येथे सात दिवसांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी करता येते. सध्या या बँकेत एफडीवर 3 टक्क्यांपासून ते 6.80 टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जातं. कालावधीनुसार व्याजदर बदलतो, पण काही विशेष एफडी योजनांवर बँक जास्त व्याज देत आहे, हीच गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बाब आहे.
विशेष म्हणजे, बँकेकडून 444 दिवस आणि 555 दिवसांच्या खास एफडी योजना चालवल्या जात आहेत. या योजनांमध्ये सामान्य ग्राहकांना 6.30 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना 6.80 टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय नियमित एफडी योजनांमध्येही बँकेकडून चांगला परतावा दिला जातो. उदाहरणार्थ, तीन वर्षांच्या नियमित एफडीवर सामान्य ग्राहकांना 6 टक्के आणि सीनियर सिटीजनना 6.50 टक्के व्याज मिळत आहे.
आता याचा थेट फायदा किती होतो, हे एका सोप्या उदाहरणातून समजून घ्यायला हवं. जर एखाद्या सामान्य गुंतवणूकदाराने सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली, तर मॅच्युरिटीवेळी त्याला एकूण 1 लाख 19 हजार 562 रुपये मिळतात. म्हणजेच जवळपास 19 हजार 562 रुपये केवळ व्याजाच्या स्वरूपात मिळतात. त्याचवेळी जर ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली, तर त्याला सुमारे 21 हजार 341 रुपये व्याज मिळतं. म्हणजेच एकूण रक्कम 1 लाख 21 हजारांच्या आसपास जाते.
आजच्या काळात जिथे जोखीम असलेल्या गुंतवणुकीपासून अनेक जण दूर राहू इच्छितात, तिथे सरकारी बँकेची अशी एफडी योजना अनेकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे. घरात पडून असलेला पैसा निष्क्रिय ठेवण्यापेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केल्यास तो सुरक्षितही राहतो आणि वाढतोही. त्यामुळे एफडी करणाऱ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही योजना सध्या नक्कीच विचार करण्यासारखी आहे.
( Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ माहिती करीत आहे गुंतवणुकी बाबत कुठलाही सल्ला देत नाही, गुंतवणूक करण्यापूर्वी)