LPG Gas Cylinder Price: नवीन वर्षाची पहाट उजाडली आणि 2026 चं स्वागत करताना सर्वसामान्यांच्या पदरी मात्र आनंदाऐवजी चिंतेचीच भेट आली. एकीकडे नवीन वर्षात महागाई कमी होईल, खर्चावर थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना, दुसरीकडे वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीने सामान्य कुटुंबांना मोठा झटका दिला आहे. स्वयंपाकघराशी थेट संबंध असलेल्या गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्यामुळे याचा परिणाम थेट घरगुती बजेटवर होणार आहे.
तेल विपणन कंपन्यांनी 1 जानेवारी 2026 पासून एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू केले असून, यामध्ये प्रामुख्याने व्यावसायिक 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ देशभर लागू असून मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैद्राबादसह सर्व प्रमुख शहरांमध्ये नवीन दर लागू झाले आहेत. एका झटक्यात प्रति सिलेंडर तब्बल 111 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आल्याने हॉटेल व्यवसाय, कॅटरिंग, छोटे व्यावसायिक यांच्यावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आधी 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर सुमारे 1580.50 रुपयांना मिळत होता. मात्र आता त्याची किंमत वाढून 1691.50 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत हा सिलेंडर आधी 1531.50 रुपयांना मिळत होता, तो आता 1642.50 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. चेन्नईमध्ये तर किंमत 1739.50 रुपयांवरून थेट 1849.50 रुपयांवर गेली आहे. या आकड्यांवर नजर टाकली तर महागाईचा फटका किती मोठा आहे, हे सहज लक्षात येतं.
विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली होती. त्यामुळे अनेक शहरांमध्ये दर थोडेसे स्वस्त झाले होते आणि व्यवसायिकांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा दर वाढवल्यामुळे तो दिलासा फार काळ टिकला नाही. नव्या वर्षात महागाई कमी होईल, किमान आवश्यक वस्तू तरी स्वस्त होतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात उलट चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशात महागाई सातत्याने वाढत असल्याचं चित्र आहे. इंधनाचे दर, जीवनावश्यक वस्तू, वीज, शिक्षण, आरोग्य अशा प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतोय. सरकारकडून वेळोवेळी महागाई नियंत्रणात असल्याचे दावे केले जात असले, तरी जमिनीवरची वास्तव परिस्थिती वेगळीच असल्याचं या दरवाढीतून स्पष्ट होतं. एलपीजीसारख्या अत्यावश्यक वस्तूच्या किंमती वाढल्यावर त्याचा फटका शेवटी सामान्य नागरिकांनाच बसतो. LPG Gas Cylinder Price
2026 च्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे एलपीजी सिलेंडर महाग झाल्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात अनेकांसाठी निराशाजनक ठरली आहे. स्वयंपाकघराचा खर्च आधीच वाढलेला असताना, आता ही नवी दरवाढ घर चालवणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. येत्या काळात घरगुती एलपीजीच्या दरातही बदल होणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण महागाईची ही साखळी अशीच सुरू राहिली, तर सामान्य माणसाचं बजेट सांभाळणं अधिकच कठीण होणार आहे.