Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहिली जात होती, तो नोव्हेंबर महिन्याचा ₹१५०० चा हप्ता अखेर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ लागला आहे. ग्रामीण भागातील असो वा शहरी परिसरातील, अनेक महिलांनी मोबाईलवर आलेल्या मेसेजमुळे थोडा तरी हायसे वाटल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र, या आनंदासोबतच आता एक नवा प्रश्न महिलांच्या मनात घर करून बसला आहे, तो म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार?
नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र मिळतील, अशा चर्चा जोरात सुरू होत्या. त्यामुळे अनेक महिलांनी दोन महिन्यांचे ₹३००० मिळतील, अशी अपेक्षा धरली होती. मात्र प्रत्यक्षात फक्त एकाच महिन्याचा हप्ता जमा झाल्याने काही प्रमाणात निराशा दिसून येत आहे. रोजच्या खर्चात, घर चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा औषधोपचारासाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या महिलांना पुढील हप्त्याची आतुरता लागून राहिली आहे.
डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता १४ जानेवारीपूर्वी जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच हा हप्ता देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, जानेवारी महिना सुरू झाल्याने आता डिसेंबरसोबतच जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार, अशा चर्चा सोशल मीडियावर आणि गावागावात सुरू असल्या तरी सध्या तरी याबाबत कोणतीही ठोस किंवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
नोव्हेंबरचा हप्ता जमा होऊनही अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, तर काही ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असा दावा करण्यात आला आहे.
याचदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर येत आहे. पुढील महिन्यांपासून केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला जाऊ शकतो. तसेच जे निकषात बसत नाहीत, अशा महिलांनाही योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी वेळेत केवायसी पूर्ण करणे आणि आपली पात्रता तपासणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी आधारवड ठरत आहे. घरखर्चात हातभार लावणारी ही रक्कम वेळेवर मिळावी, हीच प्रत्येक लाडक्या बहिणीची अपेक्षा आहे. आता डिसेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होतो, याकडे संपूर्ण राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. Ladki Bahin Yojana