Heavy Rain Alert: नवीन वर्षाची सुरुवात होताच हवामानाने अचानक करवट घेतल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर, काही आठवडे ढगांनी पूर्णपणे माघार घेतली होती. मात्र, वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील काही भागांत अचानक मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली.
गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने हैराण झालेल्या नागरिकांना, मध्येच आलेल्या पावसाने आणखी अडचणीत टाकलं. सकाळ-संध्याकाळ धुके, थंडी आणि त्यात अचानक आलेला पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून सरी कोसळत आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 2, 3, 4 आणि 5 जानेवारी या चार दिवसांसाठी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये काही भागांत जोरदार पावसासह गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जानेवारी महिन्यातही थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट सुरूच राहील. राज्यातील काही भागांत पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, संपूर्ण जानेवारी महिन्यात अधूनमधून पावसाची हजेरी लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच, राज्यातून पावसाची पूर्णपणे एक्झिट होणार नाही, असंच चित्र आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मेरठ, गाझियाबाद, नोएडा, हापूर, बागपत, बुलंदशहर, सहारनपूर, शामली, मोरादाबाद आणि बिजनौर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, 2 ते 5 जानेवारी दरम्यान जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये पावसासह गारपिटीचा धोका असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
दक्षिण भारतातही हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या काही भागांत 2 आणि 3 जानेवारी रोजी जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असून, कधी तीव्र थंडी तर कधी जोरदार पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचदरम्यान मुंबई, दिल्ली आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयांनीही महापालिकांना फटकारलं असून, वायू प्रदूषण हा गंभीर आणि तातडीने हाताळण्याचा विषय असल्याचं स्पष्ट केलं आहे.
एकीकडे थंडी, दुसरीकडे पाऊस आणि त्यात वाढतं प्रदूषण—अशा तिहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानाकडे लक्ष ठेवूनच घराबाहेर पडणं आणि आवश्यक ती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. Heavy Rain Alert