Mumbai Pune Expressway : पुणे ते मुंबई हा प्रवास म्हटलं की अनेकांच्या आठवणी एकाच वेळी जाग्या होतात. कुणासाठी रोजची नोकरी, कुणासाठी व्यवसाय, कुणासाठी हॉस्पिटल, तर कुणासाठी आपली माणसं. पण गेल्या काही वर्षांत हा प्रवास जितका गरजेचा, तितकाच त्रासदायकही झाला होता. घाटात लागणाऱ्या रांगा, पावसाळ्यात होणारी कोंडी, अपघातांचा धोका आणि वेळेचं गणित पूर्ण बिघडलेलं. मात्र आता या सगळ्यावर तोडगा निघण्याची वेळ जवळ आली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अखेर अंतिम टप्प्यात आला असून प्रवाशांसाठी ही खरंच दिलासादायक बातमी आहे.
राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि राज्याची राजधानी मुंबई यांना जोडणारा हा मार्ग अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर व्हावा, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. सध्या मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचं जवळपास 93 टक्के काम पूर्ण झालं आहे, उर्वरित कामही युद्धपातळीवर सुरू आहे. म्हणजेच, जे काम वर्षानुवर्षं कागदावर आणि डोंगरात अडकलेलं होतं, ते आता प्रत्यक्षात डोळ्यांसमोर उभं राहिलं आहे. Mumbai Pune Expressway
या प्रकल्पातील सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे 181 मीटर उंचीचा देशातील सर्वाधिक उंच दरी पूल. घाटात उभं राहून वर नजर टाकली, तर हा पूल म्हणजे खरंच अभियांत्रिकीचं आश्चर्य वाटतं. खोल दरी, अवघड भूभाग, पावसाळ्याचं आव्हान आणि सुरक्षिततेचे प्रश्न… हे सगळं पार करत हा पूल उभा राहिला आहे. काम अतिशय कठीण होतं, पण अखेर ते पूर्णत्वाकडे पोहोचलं आहे.
या तारखेला सुरू होऊ शकतो नवा मार्ग
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राबवण्यात येणारा हा प्रकल्प आता शेवटच्या टप्प्यात आहे. कामाची सध्याची गती पाहता, मे 2026 पर्यंत मिसिंग लिंक पूर्णपणे तयार होऊन वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पुढच्या वर्षी उन्हाळ्यात पुणे–मुंबई प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे घाट सेक्शनमधील 13.3 किलोमीटरचा अवघड आणि वेळखाऊ प्रवास कमी करणे. यासाठी दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले आहेत. त्यातील एक बोगदा 1.68 किलोमीटर लांबीचा असून दुसरा तब्बल 8.87 किलोमीटर लांबीचा आहे. हे बोगदे सुरू झाले की घाटात वळणं, चढ-उतार आणि ट्रॅफिकचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
पावसाळ्यात या कामावर मोठा परिणाम झाला होता. मुसळधार पाऊस दरडी कोसळण्याचा धोका, कामगारांची सुरक्षितता अनेक अडचणी आल्या. पण तरीही हा प्रकल्प थांबला नाही हळूहळू का होईना पण पुढे सरकत राहिला.
२०१९ मध्ये या प्रकल्पाचं काम सुरू झालं तेव्हा खर्च अंदाजे ६६९० कोटी रुपये होता. मात्र कालांतराने अडचणी बदल आणि वाढीव कामामुळे हा खर्च आता साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा प्रवास या मिसिंग लिंक मुळे अधिक सरळ, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
एकूण काय तर, पुणे–मुंबईचा प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी ही बातमी म्हणजे थोडा उशीर झाला, पण शेवटी मार्ग मोकळा होतोय अशीच आहे. मे 2026 पासून हा मार्ग सुरू झाला तर वेळ इंधन आणि ताण तिन्हींची बचत होणार आहे.
हे पण वाचा | पुणेकरांसाठी मोठी बातमी! वंदे भारत रेल्वे बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रवाशांवरती होणार परिणाम?