Maharashtra Highway News : पुणेकरांसाठी नववर्षाची सुरुवातच दिलासादायक ठरली आहे. नवीन वर्षाला अवघे काहीच दिवस झाले असताना शहराच्या आणि जिल्ह्याच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेली एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी, औद्योगिक परिसरातील जड वाहतूक, कार्यालयीन वेळेतील ताणतणाव आणि गावाकडून शहराकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांचा रोजचा संघर्ष पाहता, ही बातमी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ठरणार आहे. मकर संक्रांतीच्या आधीच पुणेकरांना हे गोड सरप्राइज मिळाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच दोन अत्यंत महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांच्या कामाला सुरुवात होणार आहे. Maharashtra Highway News
खरं सांगायचं तर पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर आणि वेगाने वाढणारं औद्योगिक केंद्र आहे. पण याच वेगवान वाढीबरोबर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत गेली. सकाळी ऑफिसला निघालेला नोकरदार असो, शाळेत जाणारा विद्यार्थी असो किंवा शेतमाल घेऊन शहरात येणारा शेतकरी असो, प्रत्येकालाच रस्त्यावर तासन्तास अडकून पडण्याचा अनुभव येऊ लागला. हीच समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून (MSIDC) दोन मोठे आणि महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत आणि याच वर्षात प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प म्हणजे हडपसर–यवत मार्गावरील सहापदरी उड्डाणपूल. पुणे–सोलापूर महामार्गावर रोज होणारी प्रचंड वाहतूक कोंडी पुणेकरांच्या डोक्याचा ताप ठरली होती. भैरोबा नाळा परिसरापासून यवतपर्यंतचा हा संपूर्ण पट्टा कायमच जड वाहतुकीने गजबजलेला असतो. याच पार्श्वभूमीवर हडपसरमधील भैरोबा नाळा ते यवत दरम्यान सहा पदरी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाला गेल्या वर्षीच मंजुरी मिळाली होती आणि नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुधारित प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली होती. विशेष म्हणजे सुरुवातीच्या आराखड्यात आता वाढ करण्यात आली असून उड्डाणपुलाची लांबी सुमारे 4.5 किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल 5,262 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला असून, हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सोलापूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि ताणतणावमुक्त होणार आहे.
दुसरा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे तळेगाव–चाकण–शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548डी. हा मार्ग केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण औद्योगिक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चाकण, तळेगाव, रांजणगाव या भागातील औद्योगिक वसाहतींमुळे या मार्गावर दिवस-रात्र मालवाहतूक सुरू असते. त्यामुळे अपघात, ट्रॅफिक जॅम आणि वेळेचा अपव्यय हे नेहमीचं चित्र बनलं होतं. आता या महामार्गाच्या एकूण 53.2 किलोमीटर लांबीपैकी तब्बल 24.2 किलोमीटरचा भाग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवला जाणार असून, यामुळे औद्योगिक वाहतूक आणि दैनंदिन प्रवास यामध्ये स्पष्ट वेगळेपणा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही प्रकल्प गेल्या वर्षीच मंजूर झाले असून सध्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सर्व प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि अंतिम मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. MSIDC कडून सर्व नियोजन पूर्ण झाले असून येत्या दोन महिन्यांत या दोन्ही महामार्ग प्रकल्पांचे काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या दोन्ही प्रकल्पांचे कंत्राट मोंटेकार्लो लिमिटेड या नामांकित कंपनीला देण्यात आले आहे.
एकंदरीत पाहता नववर्षाच्या सुरुवातीलाच पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार असून शहराचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नववर्षात सुरू होणारी ही कामे पुणेकरांच्या दैनंदिन जीवनात बदल घडवणारी ठरतील एवढं मात्र नक्की.
हे पण वाचा | महाराष्ट्रात लवकरच मोठा महामार्ग होणार! केंद्र सरकारची मंजुरी पहा कसा असणार रूट