कापसाला सोन्याचा दर! कापुस बाजार भावात तुफान वाढ, जाणून घ्या नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Price: नवीन वर्षाची सुरुवात होताच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घसरलेले कापसाचे दर आता पुन्हा एकदा सावरताना दिसत असून, खासगी बाजारात कापसाला चांगली मागणी निर्माण झाली आहे. परिणामी प्रतिक्विंटल दर थेट ७ हजार ८०० ते ८ हजार रुपयांच्या आसपास पोहोचले असून, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे भाव उमटले आहेत.

डिसेंबर महिन्यात खासगी बाजारात कापसाचे दर ७ हजार ते ७ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आल्याने अनेक शेतकऱ्यांनी भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) हमी खरेदी केंद्रांचा आधार घेतला होता. केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी मध्यम स्टेपल कापसासाठी ७ हजार ७१० रुपये, तर लांब स्टेपल कापसासाठी ८ हजार ११० रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. त्या दराने सीसीआयकडून खरेदी सुरू असली, तरी आता खासगी बाजारातील दर या हमीभावाच्या जवळपास पोहोचल्याने शेतकऱ्यांचा कल पुन्हा व्यापाऱ्यांकडे वळताना दिसतो आहे.

जानेवारी महिन्यापासून कापसाच्या मागणीत वाढ झाल्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येत आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कापसाला ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, तर अकोटसह काही खासगी बाजारांमध्ये कापसाचा दर थेट ८ हजार रुपयांपर्यंत गेला. या वाढलेल्या दरांमुळे अनेक शेतकऱ्यांनी हमी केंद्रांऐवजी खासगी बाजारात कापूस विक्री करण्यास सुरुवात केली आहे. Cotton Market Price

दरम्यान, हमी खरेदी केंद्रांवरील ग्रेडिंग पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. पूर्वी लागू असलेली ग्रेडिंग पद्धत बदलण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत असून, जुन्याच पद्धतीने ग्रेडिंग करावे अशी मागणी होत आहे. मात्र, केंद्र शासनाकडून अद्याप स्पष्ट आदेश नसल्याने सध्या दुसऱ्या ग्रेडनुसारच खरेदी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळेही काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

कापसाच्या आयातीवरील शुल्काबाबतही सध्या चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कापसावरील ११ टक्के आयात शुल्क कमी केले होते. आता हे शुल्क पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याची चर्चा असली, तरी याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. कृषी अभ्यासकांच्या मते, आयात शुल्कात बदल झाला तरी त्याचा देशांतर्गत बाजारावर फारसा मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

याशिवाय सरकी आणि गठाणीच्या दरात झालेली वाढ ही कापसाच्या दरवाढीमागील महत्त्वाची कारणे ठरत आहेत. सरकीला सध्या चांगले दर मिळत असल्याने खासगी बाजारात कापसाची मागणी टिकून आहे. कापूस विपणन तज्ज्ञ राजकुमार रूंगटा यांच्या मते, “खासगी बाजारात कापसाचे दर सध्या ७ हजार ८०० ते ८ हजार रुपयांपर्यंत आहेत. मागणी वाढलेली असून, सरकीचे दरही चढे आहेत. त्यामुळे येत्या काळात कापसाच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

एकूणच, नववर्षाच्या सुरुवातीलाच कापसाच्या बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी चिंतेत असलेले कापूस उत्पादक शेतकरी आता पुन्हा आशेने बाजाराकडे पाहत आहेत. ही दरवाढ टिकून राहिली, तर यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी थोडाफार दिलासा देणारा ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “कापसाला सोन्याचा दर! कापुस बाजार भावात तुफान वाढ, जाणून घ्या नवीन दर”

Leave a Comment