PF Withdrawal News: पीएफ खातेदार कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी खरंच दिलासादायक ठरणारी आहे. आतापर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज, कागदपत्रांची पडताळणी आणि अनेक दिवसांची वाट पाहावी लागत होती. मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले जात आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आणि एनपीसीआय (NPCI) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच BHIM UPI च्या माध्यमातून तात्काळ पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सुरू होणार आहे.
देशभरातील तब्बल ३० कोटींहून अधिक पीएफ सदस्यांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे. ईपीएफओच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया एटीएममधून पैसे काढण्याइतकीच सोपी होणार आहे. सध्या ही सुविधा अंतिम टप्प्यात असून पुढील दोन ते तीन महिन्यांत ती प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही सुविधा फक्त BHIM UPI ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फोन पे, गुगल पे यांसारख्या इतर यूपीआय ॲप्सवरही ही सेवा सुरू केली जाईल. त्यामुळे भविष्यात कोणत्याही यूपीआय ॲपद्वारे पीएफ ऍडव्हान्स किंवा विड्रॉल क्लेम करणे शक्य होणार आहे. PF Withdrawal News
या नव्या प्रणालीअंतर्गत आरोग्य खर्च, शिक्षण, आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर मान्य कारणांसाठी पीएफ ऍडव्हान्स क्लेम करता येणार आहे. सदस्याने एकदा BHIM ॲपमधून क्लेम केल्यानंतर, ईपीएफओकडून बॅकएंडमध्ये आवश्यक ती पडताळणी आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेली रक्कम थेट यूपीआयशी लिंक असलेल्या बँक खात्यात तात्काळ जमा केली जाणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. ईपीएफओकडून क्लेम मंजूर झाल्यानंतर एसबीआयच्या माध्यमातून ही रक्कम संबंधित खातेदाराच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात विड्रॉल रकमेवर काही मर्यादा असणार आहेत. कारण आरबीआयने यूपीआय व्यवहारांसाठी ठरवून दिलेल्या मर्यादांमुळे एकाच वेळी संपूर्ण पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सध्या उपलब्ध होणार नाही.
तरीही, ही नवी व्यवस्था पीएफ सदस्यांसाठी मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. वेळ, कागदपत्रांचा त्रास आणि वारंवार होणारा पाठपुरावा यापासून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. डिजिटल इंडिया मोहिमेला बळ देणारा हा निर्णय असून, भविष्यात पीएफ व्यवहार अधिक पारदर्शक, जलद आणि सोपे होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.