Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकरी बांधवांसाठी गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सतावत आहे तो म्हणजे ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा ८ वा हप्ता नेमका कधी येणार? जानेवारीत की फेब्रुवारीत? कारण केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता आधीच खात्यात जमा झाला आहे आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या हप्त्याबाबत अद्याप स्पष्ट घोषणा न झाल्याने गावागावात चर्चा संभ्रम आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळत आहे. Namo Shetkari Yojana
खरं पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेला पूरक अशी राज्य सरकारची योजना आहे. केंद्राकडून वर्षाला ६ हजार रुपये मिळतात, त्यावर राज्य सरकारकडून अतिरिक्त ६ हजार रुपये देण्यात येतात. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२ हजार रुपयांचा थेट फायदा होतो. याच योजनेचा ८ वा हप्ता कधी मिळणार, याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मात्र सध्या राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असून त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे कोणतीही आर्थिक मदत थेट खात्यात वर्ग करताना निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते. याच कारणामुळे नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा ८ वा हप्ता जानेवारीत जमा होऊ शकलेला नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता प्रशासकीय पातळीवरून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा हप्ता फेब्रुवारीत येण्याची अधिक शक्यता असल्याचं चित्र सध्या दिसत आहे, मात्र यावर अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.
दरम्यान, या हप्त्यापूर्वीच आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, ती म्हणजे लाभार्थी यादीची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली छाननी. कृषी विभागाने यंदा योजनेच्या अंमलबजावणीत अधिक काटेकोरपणा आणला आहे. अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी राज्यभर तपासणी सुरू असून याचा थेट परिणाम लाभार्थ्यांच्या संख्येवर होत आहे. यापूर्वी पीएम किसान योजनेत लाभार्थ्यांची संख्या सुमारे ९६ लाखांवरून ९१ लाखांपर्यंत कमी झाली होती. त्याच धर्तीवर आता नमो शेतकरी योजनेतही ४ ते ५ लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छाननीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. सुमारे २८ हजार मृत लाभार्थ्यांची नावे यादीत आढळून आल्याने ती तात्काळ काढून टाकण्यात आली आहेत. तसेच एकाच जमिनीवर दोन वेळा लाभ घेत असल्याचे आढळलेल्या ३५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. याशिवाय रेशनकार्डसंबंधी नियम अधिक कडक करण्यात आले असून एका कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
याचबरोबर आयकर भरणारे शेतकरी तसेच शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले लाभार्थीही योजनेतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात आपला हप्ता येईल की नाही? अशी धाकधूक निर्माण झाली आहे. गाव पातळीवर चौकशी कृषी कार्यालयात फेऱ्या आणि ऑनलाईन स्टेटस तपासण्याचं प्रमाण वाढलं आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही संपूर्ण प्रक्रिया कोणालाही त्रास देण्यासाठी नसून, खरोखर गरजू, अल्पभूधारक आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच योजना पोहोचावी, यासाठीच छाननी केली जात आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना ८ वा हप्ता नक्कीच मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
तरीही नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता नेमका जानेवारीत न येता फेब्रुवारीतच येण्याची दाट शक्यता असून अधिकृत घोषणा कधी होते याकडे आता शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. तोपर्यंत आधार, बँक खाते जमीन नोंदी आणि ई-केवायसी अपडेट ठेवणं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.