शक्तिपठ महामार्गाचा रूट बदलणार? हे तालुके आणि गाव वगळण्यात येणार वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shaktipeeth Highway News : राज्यात सध्या पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्ग चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नागपूर ते गोवा हा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या या महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या रूटमध्ये मोठा बदल होणार असल्याची शक्यता आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. काही तालुके थेट वगळले जाणार, तर काही नव्या भागांतून मार्ग नेण्याचा विचार सुरू असल्याने संबंधित शेतकरी, नागरिक आणि स्थानिक पातळीवर संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. Shaktipeeth Highway News

खरं तर हा महामार्ग प्रकल्प २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात प्रचंड चर्चेत आला होता. अनेक भागांतून तीव्र विरोध झाल्यामुळे या प्रकल्पामुळे सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत मोठा फटका बसल्याचंही बोललं गेलं. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारकडून एक टप्प्यावर हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळालं आणि सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मात्र मंजुरी मिळाल्यानंतरही विरोध काही थांबलेला नाही. विशेषतः सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी या महामार्गाविरोधात ठाम भूमिका घेतली. सुपीक जमीन, बागायती शेती, पाण्याचे स्रोत आणि उभ्या पिकांवर होणारा परिणाम हा या विरोधाचा मुख्य मुद्दा ठरला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, विकास हवा आहे, पण तो आमच्या जमिनी उद्ध्वस्त करून नको.

याच तीव्र विरोधाची दखल घेत राज्य सरकारने आता शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत निश्चित मानला जाणारा मार्ग बदलण्याची शक्यता बळावली असून, नव्या रूटबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवपासून महामार्गाचा मार्ग वळवून तो आटपाडीमार्गे चंदगडकडे नेण्याचा विचार सुरू आहे. जर हा प्रस्ताव अंतिम झाला, तर मूळ आराखड्यातील अनेक तालुके थेट महामार्गाबाहेर जाण्याची शक्यता आहे. विशेषतः तुळजापूर–करकंब–शिखर शिंगणापूर मार्गे महामार्ग साताऱ्याकडे वळवण्यात आल्यास उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला हे चार महत्त्वाचे तालुके नकाशातून वगळले जाऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

याशिवाय, आतापर्यंत चर्चेत असलेला सांगली जिल्हा पूर्णपणे या महामार्गाच्या मूळ रूटमधून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, मूळ मार्गाऐवजी माढा आणि माळशिरस या भागांतून महामार्ग नेण्याबाबतही हालचाली सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी नव्या चिंतेची भावना निर्माण झाली आहे.

दरम्यान महामार्गाविरोधातील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसतोय. बार्शी तालुका शक्तिपीठ विरोधी संघर्ष समिती’ च्या वतीने सोलापूर जिल्ह्यात रुई (भालगाव) येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असून, यासाठी तब्बल दहा जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र येणार आहेत. या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचं म्हणजे, महामार्गाचा नवा रूट नेमका कुठून जाणार याबाबत अद्याप अधिकृत गॅझेट प्रसिद्ध झालेलं नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली माहिती ही चर्चेच्या आणि अंदाजाच्या पातळीवरची आहे. मात्र सोशल मीडियावर अफवांचा पाऊस सुरू झाला असून, काही भागांत कोणीही जमीन विकू नका असे संदेश व्हायरल होत आहेत, तर काही ठिकाणी प्रस्तावित बदलांचं स्वागतही केलं जात आहे.

अधिकृत निर्णय आणि अंतिम आराखडा जाहीर होईपर्यंत शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात आणि शेतकरी आंदोलनात केंद्रस्थानी राहणार, हे मात्र नक्की.

Leave a Comment