Cotton Market : शेतकरी बांधवांनो, सध्या कापूस बाजारात जे चित्र दिसतंय ते अनेक दिवसांनी दिलासा देणारं आहे. गेल्या काही वर्षांत भावाच्या चढ-उतारांनी हैराण झालेला शेतकरी आज थोडा सावरलेला दिसतोय. कारण ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखला जाणारा कापूस पुन्हा एकदा जोर धरताना दिसतोय. काही बाजारांत भाव थेट 9 हजाराच्या दिशेने झेप घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अकोटसारख्या मोठ्या बाजारात तर कापसाचा कमाल भाव 8,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यंदा तरी चांगले दिवस येणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घोळत आहे. Cotton Market
गेल्या काही दिवसांत बाजारात जे घडतंय ते पाहिलं तर लक्षात येतं की कापसाच्या भावात अचानक उसळी येण्यामागे ठोस कारणं आहेत. सगळीकडे एकच चर्चा आहे भाव वाढतायत पण आपल्या गावात अजूनही 7,800 ते 8,100 च्या आसपासच का मिळतायत? इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बाजारात जो 8,800 चा भाव सांगितला जातो, तो कमाल भाव आहे. म्हणजे उत्तम दर्जाचा, लांब धाग्याचा, कोरडा आणि स्वच्छ कापूस असेल तरच तो दर मिळतो. सगळ्या मालाला तो दर मिळतोच असं नाही. त्यामुळे भाव ऐकून गोंधळून न जाता आपल्या कापसाची गुणवत्ता ओलावा आणि ग्रेड तपासूनच अपेक्षा ठेवायला हव्यात.
आता प्रश्न येतो हे भाव वाढले तरी का? यामागे दोन महत्त्वाची कारणं शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहेत. पहिलं कारण म्हणजे सरकारचा मोठा निर्णय. केंद्र सरकारने 31 डिसेंबरनंतर कापूस आयातीवर तब्बल 11 टक्के आयात शुल्क लावलं. यामुळे परदेशातून येणारा स्वस्त कापूस महाग झाला आणि गिरण्या, व्यापारी यांना देशांतर्गत कापसाकडे वळावं लागलं. याचा थेट फायदा भारतीय शेतकऱ्यांना मिळताना दिसतोय. अनेक जण म्हणतात हा निर्णय म्हणजे सरकारचा मास्टरस्ट्रोक’ ठरला आहे.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांची वाढलेली होल्डिंग पॉवर. यंदा अनेक शेतकऱ्यांनी भाव पडलेत म्हणून लगेच विकायचं नाही असा ठाम निर्णय घेतला. सोशल मीडिया, कृषी माध्यमं बाजाराचा अभ्यास यामुळे शेतकरी आता अधिक जागरूक झाला आहे. त्यामुळे बाजारात कापसाची आवक कमी झाली आणि मागणी मात्र कायम राहिली. अर्थशास्त्राचा साधा नियम आहे माल कमी आणि मागणी जास्त तर भाव वाढणारच. सध्या गिरणी मालकांना रोजच्या वापरासाठी कापूस मिळत नसल्याने ते चढ्या भावाने खरेदी करत आहेत.
मात्र, सगळं चांगलं चाललंय म्हणून गाफील राहणं धोक्याचं ठरू शकतं. कारण बाजार कधीही पलटी मारू शकतो. जोपर्यंत सरकार आयात शुल्कात बदल करत नाही किंवा परदेशी कापसासाठी दरवाजे उघडत नाही, तोपर्यंत सध्याची तेजी टिकण्याची शक्यता आहे. पण जर अचानक धोरण बदललं, तर भावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे 9 हजारच्याच भावावर विकायचं असा अट्टहास धरला तर नुकसानही होऊ शकतं.
आता शेतकऱ्यांनी काय करावं, हा खरा प्रश्न आहे.
जाणकारांचं मत असं आहे की लोभ न करता शहाणपणानं निर्णय घ्यावा. बाजारावर रोज लक्ष ठेवा. जर भावात 100-150 रुपयांची घसरण सुरू झाली तर उशीर न करता विक्रीचा निर्णय घ्या. हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करून ठेवा म्हणजे एक सुरक्षित पर्याय हातात राहील. सगळा माल एकाच वेळी विकण्याऐवजी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर जोखीम कमी होते आणि सरासरी चांगला भाव मिळू शकतो.
थोडक्यात सांगायचं तर सध्या परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. अनेक दिवसांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात थोडी ताकद आली आहे. ही संधी सोनं करून दाखवायची असेल तर भावाच्या नुसत्या चर्चेपेक्षा योग्य नियोजन वेळेवर निर्णय आणि बाजाराची सतत माहिती ठेवणं गरजेचं आहे. आज पांढरं सोनं चमकतंय तेव्हा डोळे उघडे ठेवून पण पाय जमिनीवर ठेवून व्यवहार केला तर यंदाचा हंगाम नक्कीच समाधान देणारा ठरू शकतो.
हे पण वाचा : कापसाला सोन्याचा दर! कापुस बाजार भावात तुफान वाढ, जाणून घ्या नवीन दर