Farmer Scheme : शेतकरी आयुष्यभर राबतो. उन्हात, पावसात, संकटातही शेती सोडत नाही. पण वय वाढलं की शरीर साथ देत नाही, उत्पन्न थांबतं आणि पुढचं आयुष्य कसं चालणार हा प्रश्न उभा राहतो. हाच विचार करून केंद्र सरकारने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपयांची खात्रीशीर पेन्शन मिळते आणि त्यामुळे वृद्धापकाळात किमान आर्थिक आधार मिळतो.
ही योजना खास करून त्या शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे फार मोठी जमीन नाही, जे आज मेहनतीवर जगत आहेत आणि उद्याच्या काळासाठी काहीतरी सुरक्षित व्यवस्था हवी आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. म्हणजे शेतकऱ्याने थोडं थोडं योगदान द्यायचं आणि केंद्र सरकार तितकीच रक्कम त्यात जमा करतं. हे पैसे LIC च्या माध्यमातून सुरक्षित पेन्शन फंडात जमा होतात.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, एकदा वयाची 60 वर्षे पूर्ण झाली की आयुष्यभर दरमहा 3,000 रुपये पेन्शन निश्चित मिळते. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. Farmer Scheme
ही योजना कोणासाठी आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या योजनेत लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे ज्यांच्याकडे 2 हेक्टर (सुमारे 5 एकर) पर्यंत शेती आहे, असे शेतकरी सहभागी होऊ शकतात. अर्ज करताना शेतकऱ्याचं वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. जितक्या लवकर वयात नोंदणी, तितकं मासिक योगदान कमी लागतं, हा योजनेचा मोठा फायदा आहे.
मात्र काही शेतकरी या योजनेस पात्र नाहीत. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, किंवा जे आधीच इतर सरकारी पेन्शन योजनांचा लाभ घेत आहेत, तसेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट यांसारख्या व्यावसायिकांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याला दरमहा फार मोठी रक्कम भरावी लागत नाही. वयानुसार ₹55 ते ₹200 पर्यंत मासिक योगदान असतं. उदाहरणार्थ, एखादा शेतकरी जर 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झाला, तर त्याला फक्त ₹55 दरमहा भरावे लागतात. 30 व्या वर्षी नोंदणी केली तर सुमारे ₹110 दरमहा, तर 40 व्या वर्षी केल्यास ₹200 दरमहा योगदान द्यावं लागतं. विशेष म्हणजे, शेतकऱ्याने जितकी रक्कम भरली, तितकीच रक्कम केंद्र सरकार स्वतः भरतं.
जर शेतकरी PM-KISAN सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असेल, तर त्याचा मासिक हप्ता थेट PM-KISAN च्या हप्त्यातून वजा होण्याची सोय देखील उपलब्ध आहे. त्यामुळे वेगळं काही करावं लागत नाही.
या योजनेत आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कुटुंब पेन्शन. शेतकऱ्याला पेन्शन सुरू झाल्यानंतर (60 वर्षांनंतर) जर दुर्दैवाने मृत्यू झाला, तर त्याच्या पत्नीला किंवा पतीला ₹1,500 दरमहा कुटुंब पेन्शन मिळते. त्यामुळे कुटुंब पूर्णपणे निराधार राहत नाही.
कधी कधी परिस्थिती बदलते. शेतकऱ्याला वाटलं की ही योजना पुढे चालू ठेवता येणार नाही, तर सलग 5 वर्षे योगदान दिल्यानंतर तो योजनेतून बाहेर पडू शकतो. अशा वेळी त्याने भरलेली रक्कम आणि त्यावर बचत खात्याइतके व्याज परत मिळते.
अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अगदी सोपी ठेवण्यात आली आहे. शेतकरी ऑफलाइन किंवा ऑनलाइन, दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑफलाइन अर्जासाठी जवळच्या Common Service Centre (CSC) मध्ये जाऊन आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, 8अ आणि मोबाईल नंबर दिला की CSC कर्मचारी संपूर्ण अर्ज भरून देतात आणि तिथेच नोंदणी पूर्ण होते.
ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास शेतकरी maandhan.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन स्वतः नोंदणी करू शकतो. मोबाईल नंबर OTP ने पडताळणी करून आधार, बँक खाते आणि वैयक्तिक माहिती भरली की नोंदणी पूर्ण होते. नोंदणीनंतर मानधन कार्ड मिळतं, जे भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे.
आज वाढत्या महागाईच्या काळात, वृद्धापकाळात दरमहा खात्रीशीर उत्पन्न असणं खूप गरजेचं आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची आर्थिक सुरक्षा कवच आहे. फारसा खर्च न करता भविष्यासाठी मजबूत आधार तयार करणारी ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी नक्कीच विचारात घ्यावी. आज थोडं योगदान दिलं, तर उद्या वयाच्या 60 नंतर दरमहा 3,000 रुपये हातात येणारी पेन्शन शेतकऱ्याचं आयुष्य नक्कीच सोपं करू शकते.