Ladki Bahin Yojana eKYC | राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ सरकारी योजना न राहता अनेक घरांसाठी आधाराची काठी ठरली आहे. घर चालवताना येणारा खर्च, मुलांचं शिक्षण, औषधोपचार किंवा अचानक उद्भवणाऱ्या गरजांसाठी दरमहा खात्यात जमा होणारे १५०० रुपये अनेक महिलांना मोठा दिलासा देत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील, शेतीवर अवलंबून असलेल्या किंवा घरकाम सांभाळत बाहेर नोकरी करू न शकणाऱ्या महिलांसाठी ही रक्कम आत्मसन्मानाने जगण्याची ताकद देणारी ठरली आहे. त्यामुळेच या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि आज सुमारे अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
मात्र, योजनेची अंमलबजावणी सुरू असताना काही ठिकाणी नियम डावलून अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे प्रकार समोर आले. खऱ्या गरजू महिलांपर्यंतच योजना पोहोचावी आणि सरकारी निधीचा गैरवापर थांबावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली. सुरुवातीला ही ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर ठेवण्यात आली होती. पण अनेक महिला तांत्रिक अडचणी, मोबाईल नसणे, नेटवर्क समस्या किंवा माहितीअभावी ही प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ई-केवायसीची मुदत वाढवून थेट ३१ डिसेंबरपर्यंत दिली.
तरीही अनेक गावांमध्ये आजही महिलांना ई-केवायसी करताना अडथळे येत आहेत. कुठे संगणक प्रणाली बंद पडते, कुठे सर्व्हर डाऊन असतो, तर कुठे आधार किंवा कागदपत्रांची अडचण भेडसावते. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आता सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-केवायसीची जबाबदारी थेट अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे. ज्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही, त्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून अंगणवाडी सेविका ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. त्यामुळे महिलांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे अनेक अडचणी दूर होतील, अशी अपेक्षा असली तरी एक गोष्ट स्पष्ट आहे – ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण न झाल्यास संबंधित महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे. याचा थेट परिणाम म्हणजे दरमहा मिळणारे १५०० रुपये थांबू शकतात. त्यामुळे ज्या महिलांनी अजून ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हा प्रश्न केवळ कागदोपत्री नसून, अनेक घरांच्या मासिक बजेटशी जोडलेला आहे.
आज लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचं एक मोठं माध्यम ठरली आहे. ई-केवायसीमुळे योजना अधिक पारदर्शक होईल, खऱ्या गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचेल आणि सरकारी पैशाचा योग्य वापर होईल, असा सरकारचा विश्वास आहे. पण त्याच वेळी, शेवटच्या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महिलांसाठी ही योजना थांबू शकते, हे वास्तवही तितकंच गंभीर आहे. त्यामुळे तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा शेजारच्या गरजू महिलांनी ई-केवायसी केली आहे का, याची एकदा खात्री करून घेणं आज गरजेचं ठरत आहे. कारण ही योजना केवळ १५०० रुपयांची नसून, ती अनेक महिलांच्या आत्मविश्वासाशी आणि सुरक्षित भविष्यासोबत जोडलेली आहे.