Maharashtra Weather Update | मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचं चित्र राज्यभर दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कडाक्याच्या थंडीने नागरिकांना गाठलं असून उत्तरेकडील भागात थंडीचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही स्पष्टपणे जाणवतोय. सुरुवातीला थंडीची लाट होती, मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी सकाळ-संध्याकाळचा गारठा कायम आहे. ग्रामीण भागात शेतात काम करणारा शेतकरी असो किंवा पहाटे कामावर निघणारा सामान्य नोकरदार, सगळ्यांनाच थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या वायू प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून हवा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे.
सर्दी, ताप, खोकला, गळ्यात खवखव होण्याच्या तक्रारी वाढल्या असून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी नागरिकांना मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येही हवा खराब श्रेणीत पोहोचली असून याचा थेट परिणाम लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच आजार असलेल्या लोकांच्या आरोग्यावर होत आहे.
पुणे शहरात हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असून एअर क्वालिटी इंडेक्स मध्यम ते खराब श्रेणीत नोंदवला जात आहे. असे असतानाही ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन म्हणजेच जीआरएपी केवळ कागदावरच असल्याची भावना नागरिक आणि पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. महापालिकेकडून आवश्यक त्या ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याने नाराजी वाढत आहे. धुळीचे ढग, वाहतूक कोंडी, बांधकामांमधून उडणारी धूळ आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे पुणेकरांचा श्वास अक्षरशः घुसमटतोय, अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक भागांत थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. धुळ्यात राज्यातील नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाडमध्ये 6.5 अंश, परभणीमध्ये 7.2 अंश, जेऊरमध्ये 7.5 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपूर, भंडारा, पुणे, मालेगाव, यवतमाळसारख्या भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या आसपास घसरलं असून विदर्भातही थंडीचा जोर वाढताना दिसतोय.
एकीकडे थंडी आणि प्रदूषणाचा त्रास सुरू असतानाच देशातील काही भागांमध्ये पावसाचं संकट उभं राहिलं आहे. यावर्षी मान्सूनच्या हंगामात देशभरात मुसळधार पाऊस झाला होता आणि अजूनही काही राज्यांमध्ये पावसाची रिपरिप कायम आहे. भारतीय हवामान विभागाने 17 ते 20 डिसेंबर या कालावधीत देशातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तराखंड, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, लडाख आणि पुद्दुचेरी येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी थंडी, काही ठिकाणी पाऊस, तर काही भागांत प्रदूषण अशा तिहेरी संकटाला सामान्य नागरिक सामोरा जात आहे.
एकूणच पाहता, बदलत्या हवामानामुळे आरोग्य, शेती आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. शेतकऱ्याला थंडीची भीती, शहरात राहणाऱ्या नागरिकाला प्रदूषणाची चिंता आणि काही राज्यांमध्ये पावसामुळे निर्माण होणारी भीषण परिस्थिती, या सगळ्यांत सामान्य माणूस भरडला जात आहे. हवामानातील हे बदल केवळ आकडेवारीपुरते मर्यादित न राहता थेट माणसाच्या जगण्यावर परिणाम करत असल्याचं वास्तव आहे. त्यामुळे प्रशासनाने जागं होणं, प्रदूषणावर ठोस उपाय करणं आणि नागरिकांनीही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आज अधिक गरजेचं बनलं आहे. थंडी, पाऊस आणि प्रदूषण यांचा हा इशारा आपण वेळीच ओळखला नाही, तर येणारे दिवस अधिक कठीण ठरू शकतात, हा विचार प्रत्येकाने करायला हवा.