ग्राहकांचे टेन्शन वाढवणारी बातमी! सोन्याचे भाव दोन लाखांच्या पुढे जाणार! काय आहे कारण जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price: सोनं… आपल्या घरातलं सगळ्यात सुरक्षित मानलं जाणारं, आईकडून मुलीकडे जाणारं, अडचणीच्या वेळी गहाण पडणारं आणि सण-समारंभात प्रतिष्ठेचं मानलं जाणारं धातू. भारतात सोन्याला केवळ गुंतवणूक म्हणून नाही, तर परंपरा, श्रद्धा आणि सुरक्षिततेचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं. लग्नसराई असो, अक्षय तृतीया असो किंवा एखादा शुभ मुहूर्त सोनं घेतल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. पण आता हाच सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. Gold Price

कारण सध्या सोन्याच्या किमतींबाबत जे अंदाज समोर येत आहेत, ते थक्क करणारे आहेत. 2025 हे वर्ष सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोन्याचं वर्ष ठरलं. याच वर्षात पहिल्यांदाच भारतात सोन्याचा दर प्रतितोळा एक लाख रुपयांच्या पुढे गेला. ज्यांनी आधी गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. पण आता प्रश्न असा आहे की, येत्या काळात दहा ग्रॅम सोनं घ्यायला खरंच दोन लाख रुपये मोजावे लागणार का?

आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारे संकेत पाहिले तर सोन्याच्या किमती अजूनही थांबण्याच्या मनःस्थितीत नाहीत. उलट ही तेजी दीर्घकाळ टिकणारी असल्याचा दावा थेट जागतिक तज्ञ करत आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी केलेलं भाकीत सध्या मोठ्या चर्चेत आहे. त्यांच्या मते येत्या काळात सोन्याचा दर प्रतिऔंस 6000 डॉलरपर्यंत जाऊ शकतो. भारतीय चलनात पाहिलं, तर हा दर सुमारे साडेपाच लाख रुपयांपर्यंत पोहोचतो.

एक औंस म्हणजे साधारण 28.34 ग्रॅम. त्या हिशोबाने विचार केला, तर भारतात प्रतितोळा सोन्याचा दर जवळपास 1 लाख 90 हजार रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. म्हणजेच दहा ग्रॅम सोनं घ्यायचं म्हटलं, तर दोन लाख रुपयांचा आकडा दूर नाही, असंच तज्ञ सांगतात.

महत्त्वाचं म्हणजे ही दरवाढ एखाद्या तात्पुरत्या

कारणामुळे होत नाहीये, असंही तज्ञ स्पष्ट करतात. डेव्हिड टेट यांच्या म्हणण्यानुसार, सध्या सोन्याच्या किमती वाढण्यामागे दीर्घकालीन आणि संरचनात्मक कारणं आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, वाढती महागाई, युद्धसदृश परिस्थिती, भू-राजकीय तणाव, डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आणि मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होणारी सोनेखरेदी या सगळ्या कारणांनी सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे.

अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा प्रतिऔंस दर 4 हजार 321 डॉलरपर्यंत पोहोचला होता. हा आतापर्यंतचा एक महत्त्वाचा उच्चांक मानला जात आहे. विशेष म्हणजे या वाढीला आशियाई देशांमधील घडामोडींचाही मोठा हातभार लागतो आहे. चीनने सोने खरेदीसंबंधीचे काही नियम शिथिल केल्यामुळे तेथील वैयक्तिक तसेच संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत.

दुसरीकडे जपानमध्ये पिढ्यानपिढ्या चालणारी संपत्ती हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रक्रियेतही सोन्याला सुरक्षित पर्याय म्हणून प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे आशियाई बाजारातून सोन्याची मागणी सातत्याने वाढताना दिसते आहे.

थोडक्यात सांगायचं झालं, तर 2025 मध्ये जशी सोन्याने गुंतवणूकदारांना खुश केलं, तसंच चित्र 2026 मध्येही दिसण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र या सगळ्या अंदाजांमुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या चिंता वाढल्या आहेत. लग्नासाठी, मुलीच्या सनई-चौघड्यासाठी किंवा घरातल्या एखाद्या शुभ प्रसंगासाठी सोनं घेणं आता आणखी महाग पडणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सोनं दोन लाखांपर्यंत जाईल की नाही, हे पुढील जागतिक घडामोडींवर अवलंबून असेल. मात्र एक गोष्ट नक्की सोनं अजूनही सुरक्षित गुंतवणूक म्हणून आपली जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या किमती कुठपर्यंत जातात, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे.

Leave a Comment