Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर गेले अनेक महिने सुरू असलेली अनिश्चितता आता हळूहळू संपत चालली आहे. राज्यात कर्जमाफी होणार की नाही, या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची चिन्हं दिसू लागली असून शासन आणि बँक स्तरावर हालचालींना वेग आला आहे. कर्जमाफीचा निर्णय जरी अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात असलं, तरी फक्त शासन जाहीर करेल म्हणून हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाही. कारण यावेळी एक छोटी चूक किंवा दुर्लक्ष शेतकऱ्याला थेट कर्जमाफीपासून वंचित ठेवू शकते.
सध्या कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, थकबाकीदारांनाच की नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही, तसेच कोणत्या कालावधीपर्यंतचं कर्ज यात येणार, याबाबत अधिकृत शासन निर्णय (GR) अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, शेतकरी संघटनांकडून जोरदार मागणी होत आहे की 2025 मध्ये अतिवृष्टी, नुकसान आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, मग त्यांचं कर्ज मार्चनंतर थकीत झालं असलं तरीही. मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक संकेत दिले गेले असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उच्चस्तरीय समितीचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शासनाचा अंतिम निर्णय अजून बाकी असला, तरी सहकारी बँका आणि सोसायट्यांनी मात्र हातावर हात ठेवलेले नाहीत. अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये माहिती संकलनाचं काम सुरू झालं असून कर्जदार शेतकऱ्यांची कागदपत्रे, तपशील आणि नोंदी अपडेट केल्या जात आहेत. उद्या अचानक कर्जमाफी जाहीर झाली, तर ऐनवेळी गोंधळ होऊ नये, म्हणून ही तयारी आताच केली जात आहे. त्यामुळे अजून जीआर आला नाही असं म्हणून दुर्लक्ष करणं अनेक शेतकऱ्यांना महागात पडू शकतं. Farmer loan waiver
जर तुम्ही सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतलेलं असेल, मग ते कर्ज थकीत असो किंवा नियमित सुरू असो, तरीही तात्काळ आपल्या सोसायटीशी संपर्क साधणं गरजेचं ठरत आहे. सध्या प्रामुख्याने आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, फार्मर आयडी, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि बँक खात्याची अद्ययावत माहिती मागवली जात आहे. विशेषतः आता सातबारा किंवा 8-अ इतकंच नव्हे, तर ‘फार्मर आयडी’ला जास्त महत्त्व दिलं जात आहे. कारण याच आयडीद्वारे शेतकऱ्याची माहिती थेट शासनाच्या प्रणालीत जाणार आहे.
याआधी 2017 आणि 2019 च्या कर्जमाफीच्या अनुभवातून एक धडा मिळालेला आहे. त्या वेळी अनेक शेतकरी केवळ कागदपत्रे अपुरी असल्यामुळे किंवा वेळेत माहिती न दिल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. विशेषतः ज्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जर मूळ कर्जदार शेतकरी हयात नसेल, तर त्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्र, मृत्यू दाखला आणि इतर आवश्यक कायदेशीर कागदपत्रे आताच सोसायटीकडे जमा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटच्या क्षणी ही कागदपत्रे मिळवणं कठीण ठरतं आणि अनेकदा नाव यादीत येत नाही.
सध्या ही संपूर्ण हालचाल प्रामुख्याने सहकारी बँका आणि सोसायट्यांपुरती मर्यादित आहे. राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांच्या कर्जदारांबाबत अजून ठोस सूचना आलेल्या नाहीत. मात्र सोसायटीचे सभासद असलेले शेतकरी जर आताच जागरूक राहिले नाहीत, तर कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर पश्चात्ताप करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
थोडक्यात सांगायचं झालं, तर कर्जमाफीचा लाभ हवा असेल, तर आजच आपली फाईल पूर्ण ठेवा. सोसायटीने मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे विलंब न करता जमा करा. कारण यावेळी कर्जमाफी मिळेल की नाही, हे फक्त निर्णयावर नाही, तर तुमची तयारी किती पूर्ण आहे यावरही ठरणार आहे.
हे पण वाचा | खुशखबर! जून 2025 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया सुरु…
1 thought on “कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनो हे काम करा अन्यथा कर्जमाफी मिळणार नाही?”