Shaktipeeth Highway :नागपूर ते गोवा असा संपूर्ण महाराष्ट्र जोडणारा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आता नव्या वळणावर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी विरोध, भूसंपादनाचे प्रश्न आणि पर्यावरणीय चिंता यामुळे रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अखेर मोठा बदल करण्यात आला असून, आता हा महामार्ग थेट मुंबईशी जोडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदलामुळे शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी ८४० किलोमीटरपर्यंत वाढणार असून, तो राज्यातील आतापर्यंतचा सर्वात लांब द्रुतगती महामार्ग ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) तयार करण्यात आलेल्या नव्या आराखड्यानुसार, यापूर्वी वार्ध्याच्या पावनारपासून गोवा सीमेवरील पत्रादेवीपर्यंत प्रस्तावित असलेला ८०३ किमीचा मार्ग आता आणखी पुढे विस्तारण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या मार्गात बदल करण्याचे संकेत दिले होते आणि त्यानुसारच आता सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चांडगड मार्गे हा महामार्ग पुढे नेण्यात येणार असून, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईकडे थेट जोडणी शक्य होणार आहे. Shaktipeeth Highway
हा बदल अचानक झालेला नाही. कोल्हापूर आणि आसपासच्या भागात सुपीक शेती जाणार, जमीन बळजबरीने घेतली जाणार, पर्यावरणाचे नुकसान होणार, अशा आरोपांसह शेतकरी आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, काम थांबलं आणि प्रकल्प तब्बल वर्षभर रखडला. या असंतोषाचा फटका सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत काही भागांत बसल्याचंही राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. अखेर सरकारने मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आणि शक्तीपीठ महामार्गाला नवं वळण देण्यात आलं.
या नव्या बदलामुळे प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. आधी अंदाजे ८६ हजार कोटी रुपयांचा असलेला खर्च आता सुमारे ९० हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. MSRDCच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अंतिम मंजुरीनंतर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भागांमध्ये संयुक्त मोजणी, भूसंपादन आणि भरपाईची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. किमान ७० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईशी जोडणी. शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे जनकल्याण महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. वर्धा ते सांगलीदरम्यान लातूर आणि सोलापूरमार्गे जाणारा सुमारे ४४२ किमीचा टप्पा जनकल्याण महामार्ग आणि मुंबई–बार्शी मार्गाच्या माध्यमातून थेट मुंबईपर्यंत पोहोचण्याचा नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. याचबरोबर भविष्यात हा महामार्ग प्रस्तावित विरार–अलिबाग कॉरिडॉरशी जोडण्याचाही विचार सुरू असून, मुंबई महानगर प्रदेशाशी संपर्क आणखी मजबूत होणार आहे.
थोडक्यात सांगायचं तर, शक्तीपीठ महामार्ग हा फक्त नागपूर–गोवा जोडणारा रस्ता न राहता आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि थेट मुंबईला एकत्र बांधणारा राज्याचा कणा ठरणार आहे. शेतकरी विरोधातून मार्ग काढत, राजकीय गणितं सांभाळत आणि विकासाचा अजेंडा पुढे नेत सरकारने या प्रकल्पाला नवा आकार दिला आहे. येत्या काळात हा महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक, पर्यटन आणि दळणवळणाच्या नकाशावर मोठा बदल घडवणार, यात शंका नाही.