Punjab Rao Dakh : राज्यात सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून, अनेक भागांत सकाळी आणि रात्री हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार ही थंडीची लाट ३० डिसेंबर २०२५ पर्यंत कायम राहणार आहे. या काळात फक्त रात्रीच नाही तर दिवसा देखील थंड वारे वाहतील, त्यामुळे वातावरणात गारवा टिकून राहील. Punjab Rao Dakh
मात्र, डख यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून हवामानात बदल सुरू होणार आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता असून, आकाशात ढगांची चादर पसरलेली दिसू शकते. त्यामुळे सध्या असलेली कडक थंडी हळूहळू कमी होईल, पण वातावरण अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.
शेतकऱ्यांसाठी बोलायचं झालं तर, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा कोणताही धोका सध्या नाही, असं पंजाब डख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऊस तोडणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांनी आणि ऊस कामगारांनी घाबरण्याचं कारण नाही. कामकाज सुरळीत सुरू ठेवता येईल. मात्र, वेलीवर वाढणारी पिके आणि फळबागा असलेल्या शेतकऱ्यांनी हवामानातील बदल लक्षात ठेवून सतर्क राहणं गरजेचं आहे. ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी डख यांनी खास सल्ला दिला आहे. ज्या शेतकऱ्यांना हरभऱ्याचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घ्यायचं आहे, त्यांनी पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावं. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत ‘रेन पाईप’च्या सहाय्याने पाणी दिल्यास जमिनीत ओल टिकून राहते. पीक थोडं मोठं झाल्यानंतर स्प्रिंकलरचा वापर केल्यास हरभऱ्याच्या वाढीस चांगला फायदा होतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
सध्या थंडीमुळे रब्बी पिकांसाठी वातावरण पोषक असलं तरी, पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण वाढल्यास पिकांची निगा राखणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हवामानात अचानक बदल झाल्यास त्याबाबतची माहिती वेळोवेळी दिली जाईल, असंही पंजाब डख यांनी स्पष्ट केलं आहे.