Ladki Bahin Yojana Next Installment 2026 | राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि दुसरीकडे घरातील माय-लेकींच्या नजरा लागल्या आहेत त्या आपल्या हक्काच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पैशांकडे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे हप्ते जमा झालेले नाहीत. नोव्हेंबर गेला, डिसेंबरही संपत आला, पण हप्ता न आल्याने लाडक्या बहिणींची चिंता वाढली आहे. बँकांच्या चकरा मारून आणि मोबाईलवर मेसेज तपासून आता महिलांचे डोळे थकले आहेत, पण आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे.
सध्या चर्चा अशी आहे की, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार महिलांना मोठी आनंदाची बातमी देऊ शकते. १५ आणि १६ जानेवारीला निवडणुका पार पडणार आहेत आणि त्याआधीच मकरसंक्रांतीचा गोडवा वाढवण्यासाठी १४ जानेवारीला महिलांच्या खात्यात थकीत हप्ते जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर असे झाले, तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे मिळून एकत्रित ४५०० रुपये महिलांना मिळू शकतात. सणासुदीच्या काळात हातात पैसे आले तर संक्रांतीचा सण खऱ्या अर्थाने आनंदात साजरा होईल, अशी भावना महिलांमधून व्यक्त होत आहे.
काही तांत्रिक कारणे किंवा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फेरा यामुळे हे पैसे रखडले असल्याची चर्चा आहे. पण संक्रांतीचा मुहूर्त साधून महिलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाऊ शकतो. मात्र, अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे, ज्या महिलांचे e-KYC अद्याप बाकी आहे, त्यांच्यासाठीही वेळ कमी उरला आहे. केवळ ८ दिवस शिल्लक असल्याने महिलांची कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू आहे. जर कागदपत्रात त्रुटी राहिली तर हक्काचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते, ही भीतीही त्यांच्या मनात आहे.
घरातील छोट्या-मोठ्या गरजांसाठी या पैशांचा मोठा आधार महिलांना वाटत असतो. मुलांचे शिक्षण असो किंवा घराचा खर्च, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेवर येणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता १४ जानेवारीला खरोखरच ‘तीळगुळ घ्या आणि गोड बोला’ म्हणत सरकार या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ४५०० रुपये जमा करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शेवटी, सण आणि निवडणुकीच्या धामधुमीत महिलांच्या पदरात काय पडतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.