महाराष्ट्रात थंडीची मोठी लाट येणार! हवामान हवामान खात्याचा या जिल्ह्यांना मोठा इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात परत एकदा ती जाणवणारी थंडीची चाहूल लागली आहे भाऊ. दोन-चार दिवसांपासून हवा पुन्हा गार होऊ लागली होती, पण काल रात्रीपासून तर पारा अक्षरशः घसरतच गेला आणि आज सकाळी राज्यातल्या अनेक भागात लोकांनी उबेसाठी शेकोट्या पेटवलेल्या दिसल्या. उत्तरेकडून आलेल्या शीत लहरींनी पुन्हा राज्यभर आपली पकड बसवायला सुरुवात केली असून हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. थंडी अशी की पहाटेपासून दव काचेसारखं दिसत होतं आणि रस्त्यावर चालताना अंगावर एक वेगळीच हुडहुड जाणवत होती. धुळे जिल्ह्यात तर कृषी महाविद्यालयात पारा ५.४ अंशांपर्यंत खाली गेला आणि हा यंदाच्या हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमानाचा आकडा ठरला.विदर्भात सगळ्यात जास्त परिणाम जाणवतोय. Maharashtra Weather Update

यवतमाळ जिल्ह्यात पारा ८.८ अंशांवर स्थिरावल्याची नोंद झाली असून ही आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद आहे. लोक पहाटे उठताना थरथर कापत आहेत, काही ठिकाणी तर धुक्याने रस्त्यांवर पांढर्‍या पडद्याचं वातावरण तयार झालं. नाशिकच्या आसपासच्या भागात, मालेगावमध्ये, धुळ्यात, नागपूर-अमरावतीच्या भागात तापमान अचानक खाली गेल्याने थंडी जास्त जाणवू लागली. मालेगावमध्ये पारा थेट ९ अंशांपर्यंत खाली गेल्याने नागरिकांना उब मिळेना अशी परिस्थिती झाली आहे.

दुसरीकडे विरोधाभासी चित्र म्हणजे दिवसा तापमान वाढतंय आणि रात्री ते अक्षरशः कोसळतंय. जळगाव, अहमदनगर, नागपूर, छ. संभाजीनगर आदी भागात हे तापमानातील चढ-उतार अधिक जाणवत आहेत. उठता-बसता अचानक थंडी वाढल्यामुळे वृद्धांना, मुलांना आणि दम्याचे, अॅलर्जीचे त्रास असणार्‍यांना जास्त अडचण येत आहे.

हवामान विभागाने सांगितलं की किमान तापमान १० अंशांच्या खाली जायला लागलं आणि तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी घटलं की थंडीची लाट मानली जाते. रविवारी धुळे, निफाड, परभणी, अमरावती, यवतमाळ येथे ही स्थिती दिसली होती. आज वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्यापासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता आहे. म्हणजेच थंडीचा कडाका येत्या दोन-तीन दिवसांत अजून वाढण्याचीच शक्यता जास्त आहे.

हवामानातील या अचानक बदलाने लोक खरोखरच त्रस्त झाले आहेत. पहाटे कामावर जाणारे कामगार, शेतकरी, दूध विक्रेते सगळ्यांच्या अंगात कंप सुटतोय. घराघरात उब मिळावी म्हणून अंगणात शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी पहाटे धुक्यामुळे वाहनांना हेडलाईट लावूनच जावं लागतंय.

राज्यात हळूहळू पुन्हा थंडीचे दिवस परतू लागलेत आणि पुढचे काही दिवस सकाळ-संध्याकाळ तापमान आणखी खाली जाईल अशी शक्यता हवामान विभागाने दिली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, उगाच हलक्या कपड्यांत बाहेर पडू नये, मुलं-वृद्धांनी विशेषत: थंडीपासून संरक्षण करावं, असा सल्लाही विभागाने दिला आहे.

Leave a Comment