Maharashtra Weather Forecas | डिसेंबर महिना आता संपत आला असून अवघ्या काही दिवसांवर नवीन वर्षाची चाहूल लागली आहे. घराघरात नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, निसर्गाने मात्र आपलं रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका भलताच वाढला असून, पहाटे आणि रात्रीच्या वेळी अंगाला झोंबणाऱ्या वाऱ्यांमुळे नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. जरी दुपारी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यावर थोडा उबदारपणा जाणवत असला, तरी संध्याकाळ होताच पुन्हा गारवा वाढू लागतोय.
उत्तर भारताचा परिणाम थेट महाराष्ट्रावर
तुम्हाला वाटत असेल ही थंडी फक्त आपल्याकडेच आहे, तर तसं नाहीये. उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली असून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात १ जानेवारीपर्यंत दाट धुक्याचा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. तिथून वाहणाऱ्या गार वाऱ्यांमुळेच आपल्या महाराष्ट्रातील उत्तर आणि मध्य भागात पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. थंडीचा हा जोर येत्या ६ दिवसांत अधिक वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
धुक्याची चादर आणि हवेचा खालावलेला दर्जा
एकडे गुलाबी थंडीचा आनंद घेताना दुसरीकडे एक चिंतेची बातमी समोर येतेय. थंडीसोबतच हवेची गुणवत्ता ढासळली असून ‘AQI’ तब्बल १९५ वर पोहोचला आहे. ही ‘अती वाईट’ श्रेणी मानली जाते. मुंबईसारख्या शहरात पहाटे धुक्याची चादर दिसत असली, तरी त्यामध्ये प्रदूषणाचे कण मिसळलेले असल्याने श्वास घेताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
पुढील ६ दिवस कसे असतील?
मुंबई: मुंबईत किमान तापमान १८ अंशांपर्यंत खाली येऊ शकतं, तर कमाल तापमान ३३ अंशांच्या आसपास राहील. म्हणजे दिवसा थोडा उकाडा आणि रात्री थंडी, असं संमिश्र वातावरण असेल.
उर्वरित महाराष्ट्र: उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम वाढणार आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंशांच्या खालीच राहण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही बाहेर पडणार असाल, तर गरम कपडे सोबत ठेवायला विसरू नका. थंडीचा हा आनंद घेताना आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, कारण बदलतं हवामान आणि प्रदूषित हवा आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते.