Bank News : नवीन वर्षाची सुरुवात होत असतानाच बँक खातेदारांसाठी महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी माहिती समोर आली आहे. जानेवारी 2026 या पहिल्याच महिन्यात बँकांच्या सुट्ट्यांची संख्या मोठी असल्याने अनेकांचे आर्थिक व्यवहार अडचणीत येऊ शकतात. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत यादीनुसार, जानेवारी महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे चेक क्लीअरन्स, कर्जाचे हप्ते, शाखेत जाऊन करायची कामे असतील, तर ती वेळेत पूर्ण करणं गरजेचं ठरणार आहे. Bank News
जानेवारी 2026 मध्ये 4 रविवार आणि 2 शनिवार (दुसरा व चौथा शनिवार) आधीच बँक हॉलिडे असणार आहेत. याशिवाय नवीन वर्ष, मकर संक्रांत, पोंगल, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि प्रजासत्ताक दिन यांसारख्या सणांमुळे आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमुळे बँकांचे कामकाज अनेक दिवस ठप्प राहणार आहे. काही सुट्ट्या संपूर्ण देशभर लागू असतील, तर काही सुट्ट्या प्रादेशिक स्वरूपाच्या असल्याने ठराविक राज्यांपुरत्याच मर्यादित राहणार आहेत.
महाराष्ट्राचा विचार केला, तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व बँका बंद राहतील. याशिवाय इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांमुळे वेगवेगळ्या तारखांना बँका बंद राहणार आहेत.
जानेवारी महिन्यातील प्रमुख बँक सुट्ट्या पाहिल्या, तर
1 जानेवारी रोजी नवीन वर्षानिमित्त काही उत्तर-पूर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
2 जानेवारीला नवीन वर्ष उत्सव आणि मन्नम जयंतीनिमित्त कोची व तिरुवनंतपुरममध्ये सुट्टी असेल.
12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कोलकातामधील बँका बंद राहतील.
14 जानेवारीला मकर संक्रांत आणि माघ बिहूच्या निमित्ताने अहमदाबाद, भुवनेश्वर आणि गुवाहाटी येथे बँकांना सुट्टी असेल.
15 जानेवारी रोजी पोंगल आणि उत्तरायण सणामुळे बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये बँका बंद राहणार आहेत.
23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि वसंत पंचमीच्या निमित्ताने कोलकाता आणि भुवनेश्वर येथे सुट्टी असेल. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
याशिवाय जानेवारी महिन्यात 4, 11, 18 आणि 25 जानेवारी हे सर्व रविवार, तर 10 जानेवारी (दुसरा शनिवार) आणि 24 जानेवारी (चौथा शनिवार) या दिवशीही बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. या सगळ्या सुट्ट्या धरल्यास एकूण 16 दिवस बँका बंद राहणार असल्याचं स्पष्ट होतं.
दरम्यान, गुंतवणूकदारांसाठीही ही माहिती महत्त्वाची आहे. बँकांसोबतच शेअर बाजारातही जानेवारीत 9 दिवस ‘नो ट्रेडिंग’ राहणार आहे. यामध्ये शनिवार-रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सुट्टीचा समावेश आहे. त्यामुळे शेअर बाजाराशी संबंधित व्यवहार आखताना गुंतवणूकदारांनी या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
बँकांच्या शाखा बंद असल्या, तरी दिलासादायक बाब म्हणजे ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि ATM सेवा मात्र सुरू राहणार आहेत. UPI, नेट बँकिंगच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहार करता येणार असले, तरी मोठे व्यवहार, कागदी कामकाज किंवा शाखेत जाऊन करायची कामे असतील, तर ती जानेवारी सुरू होण्याआधी किंवा सुट्ट्यांमध्ये अंतर असलेल्या दिवशी पूर्ण करणं शहाणपणाचं ठरणार आहे.
एकूणच, नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँक सुट्ट्यांचा ‘पाऊस’ पडणार असल्याने, आर्थिक व्यवहारांची योग्य आखणी केली नाही, तर अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळेत तयारी करा आणि बँकेची कामे लवकर उरका.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही,)