Aadhar Card PAN Card Link : आजच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे केवळ कागदपत्र उरलेले नाहीत, तर प्रत्येक आर्थिक व्यवहाराची किल्ली बनली आहेत. बँकेत खाते उघडायचं असो, आयटीआर भरायचा असो किंवा एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असो पॅन आणि आधारशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. अशातच सरकारकडून पुन्हा एकदा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. ज्यांनी अजूनही आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं नाही, त्यांच्यासाठी आता वेळ फारच कमी उरली आहे.
सरकारनं आधार–पॅन लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही, तर 1 जानेवारी 2026 पासून ते पॅन कार्ड थेट निष्क्रिय केलं जाणार आहे. एकदा पॅन निष्क्रिय झालं, की त्याचे परिणाम लगेच दिसायला लागतील. आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे, असंही स्पष्ट सांगण्यात आलं आहे. Aadhar Card PAN Card Link
यूआयडीएआय आणि आयकर विभागानुसार, ज्यांचं पॅन आधारशी लिंक नसेल, ते आयटीआर फाईल करू शकणार नाहीत. इतकंच नाही, तर टॅक्स रिफंड अडकू शकतो, नवीन बँक खाते उघडताना अडचणी येऊ शकतात, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड मिळणं कठीण होऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर पॅन निष्क्रिय झालं, की रोजच्या आर्थिक गरजांवर थेट परिणाम होणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, एकदा पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यानंतर ते पुन्हा सुरू करायचं असेल, तर 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे ‘नंतर करू’ असा विचार करणाऱ्यांना हा निर्णय महागात पडू शकतो. सरकारनं दिलेल्या मुदतीतच आधार–पॅन लिंक करून घेणं फायद्याचं ठरणार आहे.
आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी कुठल्याही कार्यालयात रांगेत उभं राहण्याची गरज नाही. हे संपूर्ण काम मोबाईल किंवा लॅपटॉपवरून घरबसल्या करता येतं. यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जावं लागतं. तिथे ‘Quick Links’ मध्ये ‘Link Aadhaar’ हा पर्याय उपलब्ध आहे. लॉगिन करून किंवा थेट लॉगिन न करता देखील आधार आणि पॅन लिंक करता येतं. आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि आधारवरील नाव भरल्यानंतर ओटीपीद्वारे पडताळणी केली जाते आणि काही मिनिटांत लिंकिंग पूर्ण होतं.
ज्यांना ऑनलाइन पद्धत सोपी वाटत नसेल, त्यांच्यासाठी एसएमएसचा पर्यायही उपलब्ध आहे. आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक ठराविक फॉरमॅटमध्ये 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवूनही लिंकिंग करता येतं.
थोडक्यात सांगायचं तर, 31 डिसेंबर 2025 नंतर “माझं पॅन चालत नाही” अशी तक्रार करायची वेळ येऊ नये, यासाठी आत्ताच आधार–पॅन लिंक करून घेणं गरजेचं आहे. कारण एकदा पॅन निष्क्रिय झालं, की केवळ व्यवहारच नाही, तर 1000 रुपयांचा दंडही खिशातून जाणार आहे. त्यामुळे वेळ असतानाच हे काम उरकून टाकणंच शहाणपणाचं ठरणार आहे.
( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही विविध माहितीस्त्रोतांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)