Credit Score: 2025 हे वर्ष आता संपत चाललं आहे आणि 2026 च्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. नवीन वर्ष म्हटलं की लोक नव्या स्वप्नांची, नव्या योजनांची आखणी करतात. कोणी घर घेण्याचं स्वप्न पाहतो, कोणी गाडी घेण्याचं, तर कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. पण या सगळ्यांचा एक महत्त्वाचा दुवा असतो, तो म्हणजे क्रेडिट स्कोअर.
आजच्या काळात बँक किंवा वित्तसंस्था कोणतंही कर्ज देताना सर्वात आधी तुमचा CIBIL स्कोअर तपासतात. जर हा स्कोअर बिघडलेला असेल, तर चांगली नोकरी आणि उत्पन्न असूनही लोन नाकारलं जातं. नवीन वर्षात लोन किंवा क्रेडिट कार्ड मिळवताना अडचण येऊ नये, यासाठी आत्ताच काही महत्त्वाचे आर्थिक संकल्प घेणं गरजेचं आहे. हे संकल्प पाळले, तर 2026 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर नक्कीच सुधारू शकतो. Credit Score
सर्वात आधी लक्ष द्यायची गोष्ट म्हणजे जुनी थकबाकी. अनेक वेळा आर्थिक अडचणी, विसरभोळेपणा किंवा निष्काळजीपणामुळे EMI किंवा क्रेडिट कार्डचं बिल वेळेवर भरलं जात नाही. एक-दोन हप्ते थकले तरी त्याचा मोठा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो आणि ही नोंद क्रेडिट रिपोर्टमध्ये बराच काळ राहते. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करतानाच सर्व जुने थकलेले हप्ते, बिले किंवा लोनची बाकी रक्कम शक्य तितक्या लवकर फेडण्याचा संकल्प करा. एकदा थकबाकी संपली की, बँकांचा विश्वास पुन्हा हळूहळू वाढू लागतो आणि स्कोअर सुधारण्याची प्रक्रिया सुरू होते.
याशिवाय, क्रेडिट कार्डचा वापरही अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की फक्त वेळेवर बिल भरलं की क्रेडिट स्कोअर सुरक्षित राहतो, पण प्रत्यक्षात बँका हेही पाहतात की तुम्ही तुमच्या एकूण क्रेडिट लिमिटपैकी किती रक्कम वापरता. जर सतत जास्त प्रमाणात कार्ड स्वाइप केलं, तर स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, एकूण क्रेडिट लिमिटच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त वापर टाळावा. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा, गरज नसलेला खर्च टाळा आणि महिन्याचा अंदाजे बजेट आधीच ठरवा. यामुळे आर्थिक शिस्त लागते आणि क्रेडिट स्कोअरही सुरक्षित राहतो.
तिसरी आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासणं. बरेच लोक आपली क्रेडिट रिपोर्ट फक्त लोन घ्यायचं असेल तेव्हाच पाहतात, पण ही सवय धोकादायक ठरू शकते. अनेक वेळा रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असते, जसं की वेळेवर भरलेला हप्ता थकबाकी म्हणून दाखवला जाणं, चुकीची बाकी रक्कम दिसणं किंवा एखाद्या दुसऱ्याचं लोन आपल्या नावावर दिसणं. अशा चुका थेट क्रेडिट स्कोअर खराब करतात. त्यामुळे दर काही महिन्यांनी आपली CIBIL रिपोर्ट तपासणं आणि काही गडबड आढळली तर तात्काळ बँक किंवा क्रेडिट ब्युरोकडे तक्रार नोंदवणं गरजेचं आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर, 2026 मध्ये आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल, तर केवळ कमाई वाढवणं पुरेसं नाही. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी शिस्त, जागरूकता आणि वेळेवर निर्णय घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. योग्य वेळी हे संकल्प पाळले, तर भविष्यात लोन मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमची आर्थिक वाटचाल अधिक सुरक्षित बनेल. CIBIL Score