December weather forecast : सध्या महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगलाच जाणवतोय, पण ही थंडी सगळीकडे सारखी नाही. काही ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हुडहुडी भरवणारी थंडी आहे, तर काही भागात वातावरण तुलनेने सौम्य आहे. शहरांमध्ये विशेषतः तापमान जास्त खाली घसरलेलं दिसत असून अनेक ठिकाणी किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. खान्देश, जळगाव, नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा चांगलाच प्रभाव जाणवतोय आणि ही स्थिती डिसेंबर महिना संपेपर्यंत साधारण अशीच टिकून राहण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या २० ते २२ तारखेच्या दरम्यान काही भागात आभाळात ढगांची गर्दी दिसेल, हवेत गारवा वाढेल, पण या काळात मोठ्या पावसाचा किंवा गारपीटीचा धोका सध्या तरी दिसत नाही. December weather forecast
जानेवारी महिन्याकडे पाहिलं तर, प्रशांत महासागरात सुरू असलेली ‘ला निनो’ची स्थिती हळूहळू नॉर्मलकडे झुकत असल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा फारसा गंभीर परिणाम होणार नाही, असा अंदाज तोडकर हवामान अभ्यासक व्यक्त करत आहेत. जानेवारी महिना पूर्णपणे स्वच्छ नसेल, पण बहुतांश दिवस कोरडे आणि थंड असतील. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या आसपास म्हणजेच २६ जानेवारीच्या सुमारास काही भागात वातावरण अचानक बदलू शकतं. ढगाळ हवामान तयार होऊन हलके शिंतोडे किंवा किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये नाकारता येत नाही.
फेब्रुवारी महिना शेतकऱ्यांसाठी नेहमीच जरा काळजीचा मानला जातो, कारण याच काळात अवकाळी पावसाच्या घटना घडतात. मात्र यंदा पश्चिमी वाऱ्यांची म्हणजेच WD ची ताकद तुलनेने कमी असल्याने फेब्रुवारीत मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा धोका सध्या तरी कमी दिसतोय. त्यामुळे गहू, कांदा, हरभरा, ज्वारीसारखी काढणीला आलेली पिकं असलेल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. पीक काढणीच्या काळात मोठा हवामानाचा अडथळा येण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. मात्र फेब्रुवारीच्या अखेरीस, विशेषतः शिवजयंतीच्या आसपास म्हणजे १९ फेब्रुवारीनंतर विदर्भात तापमान झपाट्याने वाढायला सुरुवात होईल. अनुभवी शेतकरी ही तापमानवाढ नेहमीच पुढील संकटाची नांदी मानतात.
खऱ्या अर्थाने हवामानातील मोठे बदल मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत दिसून येण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याची सुरुवातच काहीशी अस्थिर हवामानाने होऊ शकते. या काळात अचानक ढगांची गर्दी, जोरदार वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने मिळून वादळी आणि पावसाळी वातावरणाचे ठरू शकतात. विशेषतः ज्या शेतकऱ्यांची हळद, ऊस किंवा उन्हाळी पिकं एप्रिलपर्यंत शेतात राहणार आहेत, त्यांच्यासाठी गुढीपाडव्यापर्यंतचा काळ त्रासदायक ठरू शकतो.
यंदाचा उन्हाळाही नेहमीसारखा कोरडा न राहता अधूनमधून ढगाळ, दमट आणि पावसाळी वातावरण असलेला राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. याचा परिणाम शेतीसोबतच लग्नसराईच्या तारखांवरसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार महिने शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाकडे दुर्लक्ष न करता, काढणी, साठवणूक आणि नियोजन करताना सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.