Heavy Rain Alert : राज्यासह संपूर्ण देशात सध्या वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी अचानक थंडी वाढते, तर कधी ढगाळ वातावरण निर्माण होतंय. काही दिवसांपूर्वी राज्यात थंडी जणू गायब झाल्यासारखी वाटत होती, मात्र आता पुन्हा एकदा उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्याने गारठा वाढू लागला आहे. डिसेंबर महिना संपत आला असतानाच थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. Heavy Rain Alert
राज्यात यंदाचा डिसेंबर संपूर्णपणे थंडीच्या कडाक्यात गेला. पहाटे आणि रात्री गारवा जाणवत असतानाच आता दिवसभरही थंड वारे वाहत आहेत. धुळे येथे तर थेट 7 अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवण्यात आलं आहे. आहिल्यानगरमध्ये 7.3, परभणीमध्ये 7.5, निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपूर, गोंदिया, भंडारा, नाशिकसारख्या भागांमध्येही तापमान 10 अंशांपर्यंत घसरलं असून पुढील काही दिवस राज्यात गारठा आणखी वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
एकीकडे महाराष्ट्रात थंडीची लाट असताना तर दुसरीकडे देशातील काही भागांमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मॉन्सून संपून अनेक महिने उलटले असले तरी पावसाने जाण्याचं नाव घेतलेलं नाही. भारतीय हवामान विभागाने 28 ते 31 डिसेंबर दरम्यान देशाच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः केरळ आणि तामिळनाडूमध्ये पुढील चार दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल भागातही 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या हवामान बदलांचा परिणाम थेट आरोग्यावरही होताना दिसत आहे. मुंबई, दिल्ली आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सध्या वायू प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता निर्देशांक 200 च्या पुढे गेल्याने हवा आरोग्यासाठी घातक बनली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप आणि श्वसनाचे त्रास वाढताना दिसत आहेत. विशेषतः ज्यांना दमा, अस्थमा किंवा श्वसनाचे आजार आहेत, अशा नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
वाहनांची वाढती संख्या, सुरू असलेली बांधकामे आणि त्यातून उडणारी धूळ, तसेच कमी वेगाचे वारे यामुळे प्रदूषक हवेतच अडकून राहत आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषण ही गंभीर समस्या बनत चालली आहे. थंडीची लाट, काही भागांतील मुसळधार पाऊस आणि वाढतं प्रदूषण या तिन्ही गोष्टी एकत्र येत असल्याने नागरिकांनी पुढील काही दिवस अधिक सतर्क राहण्याची गरज आहे
एकंदरीत पाहता, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हवामानाचा मूड पूर्णपणे बदललेला दिसतोय. कुठे कडाक्याची थंडी, कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे श्वास घेणंही कठीण होईल इतकं प्रदूषण अशा परिस्थितीत नागरिकांनी हवामान अपडेट्सवर लक्ष ठेवून योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे.