Kanda Bajar Bhav: खरीप-रब्बीच्या संधिकालात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सध्या समाधानाची झलक दिसू लागली आहे. कारण सोलापूर बाजार समितीत कांद्याला मिळणारा दर हा यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचा सर्वोच्च ठरत आहे. बांगलादेश आणि श्रीलंका येथे कांद्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येत असल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील चार-पाच दिवसांपासून सोलापूरच्या मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक लक्षणीय वाढली आहे. चांगला भाव मिळत असल्याने कर्नाटक, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून शेतकरी आपला कांदा थेट सोलापुरात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. सोमवारी बाजारात २२१ ट्रक कांदा दाखल झाला होता, तर मंगळवारी ही संख्या २६१ वर पोहोचली. विशेष म्हणजे बुधवारी सोमवारी-मंगळवारी मिळालेल्या दरापेक्षा तब्बल २०० रुपयांनी अधिक भाव कांद्याला मिळाला.
बुधवारचा दिवस सोलापूर कांदा बाजारासाठी ऐतिहासिक ठरला असेच म्हणावे लागेल. यंदाच्या वर्षातील उच्चांकी भाव याच दिवशी नोंदवला गेला. चांगल्या प्रतीच्या कांद्याला तब्बल ३७०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, तर सरासरी दरही ३००० रुपयांच्या आसपास राहिला. दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून गुरुवारीही गाड्यांची आवक आणखी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. Kanda Bajar Bhav
भाव समाधानकारक असल्याने बाजार समिती परिसरात शेतकरी आणि वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी लिलाव झाल्यानंतर दिवसभर ट्रकमधून कांदा उतरवण्याची लगबग सुरू असते. रात्री उशिरापर्यंत आणि अगदी पहाटेपर्यंतही गाड्यांची ये-जा सुरू असल्याचे चित्र सध्या सोलापूर मार्केट यार्डमध्ये दिसून येत आहे.
पुणे, अहिल्यानगर, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुके, धाराशिव, उमरगा, बीड या भागांतून मोठ्या प्रमाणावर कांदा सोलापुरात येत आहे. विशेष बाब म्हणजे पूर्वी हैदराबाद किंवा लासलगावकडे जाणारा कांदाही आता चांगला दर मिळत असल्याने सोलापूर बाजारातच विक्रीसाठी वळत आहे. मात्र, मार्केट यार्डमध्ये दर वाढले असले तरी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव सध्या स्थिरच असल्याचे दिसून येत आहे.
सध्या बाजारात बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या तसेच मोठे व्यापारी मोठ्या प्रमाणावर कांद्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याला ३६०० रुपयांपर्यंत दर मिळत असून मध्यम आणि कमी प्रतीच्या कांद्यालाही ३००० ते ३२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी निर्यातीचा वेग कायम राहिल्यास दर टिकून राहतील, अशी आशा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे.
महिनोनमहिने मेहनत, पाणीटंचाई, खर्चाची चिंता आणि बाजारातील अनिश्चितता झेलणाऱ्या कांदा उत्पादकांसाठी सध्या मिळणारा हा दर म्हणजे मोठा दिलासा ठरत आहे. “आज तरी आपल्या घामाचे चीज झाले,” असे समाधानाचे शब्द अनेक शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत.