Ladki Bahin Yojana: डिसेंबर महिना संपत आला, थंडीचा कडाका वाढलाय, घरखर्चाचं गणित बिघडत चाललंय. आणि याच दरम्यान राज्यातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय. “लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी येणार?” कारण नोव्हेंबर महिना कधीच मागे पडला, पण अजूनही १५०० रुपयांचा हप्ता अनेक बहिणींच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे साहजिकच महिलांमध्ये नाराजी, अस्वस्थता आणि चिंता वाढलेली दिसतेय. मात्र आता या सगळ्यातून एक दिलासादायक अपडेट समोर आली आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेतील थकलेले हप्ते लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात मिळणार
लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात थेट महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या हप्त्याअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ₹१५०० जमा होणार आहेत. वर्षअखेरीस ही बातमी महिलांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. घरात किराणा, औषधपाणी, मुलांचा खर्च अशा अनेक गोष्टींसाठी लाडकी बहीण योजनेचा आधार असतो. त्यामुळे हा हप्ता वेळेवर मिळणं महिलांसाठी फार महत्त्वाचं आहे.
मकरसंक्रांतीआधी ₹४५०० मिळण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक मोठी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो.
जर तसं झालं, तर १४ जानेवारी मकरसंक्रांतीआधी महिलांच्या खात्यात एकाच वेळी ₹३००० जमा होण्याची शक्यता आहे. यामध्ये जर नोव्हेंबरचा हप्ता धरला, तर एकूण ₹४५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. संक्रांतीसारख्या सणाच्या आधी ही रक्कम मिळाल्यास अनेक घरांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल, यात शंका नाही.
अपात्र महिलांना लाभ नाही, अनेक अर्ज झाले बाद
लाडकी बहीण योजनेत सुरुवातीला अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. मात्र तपासणीदरम्यान अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या. निकषांमध्ये न बसणाऱ्या, चुकीची माहिती दिलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत. यामुळे पात्र महिलांनी आपली सर्व कागदपत्रं आणि माहिती बरोबर असल्याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. Ladki Bahin Yojana
e-KYC साठी दिलासा मिळणार का?
लाडकी बहीण योजनेत e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मात्र अजूनही लाखो महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सरकारकडून मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मुदतवाढ मिळाली, तर अनेक महिलांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे ज्यांची e-KYC बाकी आहे, त्यांनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे.
लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत नाही, तर राज्यातील महिलांसाठी आधाराची, सन्मानाची आणि सुरक्षिततेची योजना आहे. हप्ते थोडे उशिरा आले तरी सरकार महिलांचा विचार करत आहे, हे या अपडेटवरून स्पष्ट होतंय. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत माहितीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या आठवड्याकडे लागल्या आहेत. खरंच लाडकीच्या खात्यावर पैसे खटाखट जमा होणार का? उत्तर लवकरच मिळेल.