Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मकरसंक्रांतीआधीच दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार असून, पुढील चार दिवसांत थेट ३ हजार रुपये खात्यात वर्ग केले जाणार आहेत. याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून ही रक्कम १४ जानेवारीपूर्वी खात्यात जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Ladki Bahin Yojana
गेल्या काही आठवड्यांपासून अनेक लाडक्या बहिणी आपल्या हप्त्याबाबत चिंतेत होत्या. नोव्हेंबरनंतर केवळ १५०० रुपयेच खात्यात जमा झाले होते. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता कधी येणार? असा प्रश्न गावागावात शहरातही महिलांकडून विचारला जात होता. काही महिलांनी सणासाठी लागणाऱ्या खर्चाचं नियोजन थांबवलं होतं तर काहींनी हातावर पोट असताना ही रक्कम फारच महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ही विशेष भेट दिली जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे प्रत्येकी १५०० रुपये असे एकूण ३ हजार रुपये थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
या घोषणेसोबत एक पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आलं असून त्यामध्ये लाडक्या बहिणींना संक्रांतीचं मोठं गिफ्ट देण्यात येत असल्याचा संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मदत थेट बँक खात्यात जमा होणार असल्याने महिलांना कुठेही फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.
राज्यातील ग्रामीण भागात या योजनेचा मोठा आधार अनेक महिलांना मिळतोय. घरखर्च मुलांचं शिक्षण, औषधपाणी किंवा सणासुदीचा खर्च यासाठी हे १५०० रुपयेही अनेक कुटुंबांसाठी फार महत्त्वाचे ठरतात. अशातच संक्रांतीसारख्या सणाच्या तोंडावर एकदम ३ हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. एकूणच लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी ही रक्कम केवळ आर्थिक मदत नाही तर अनेक महिलांसाठी ती आधाराची भावना आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो लाडक्या बहिणींची यंदाची संक्रांत नक्कीच गोड होणार यात शंका नाही.
हे पण वाचा | महिलांची टेन्शन वाढवणारी बातमी! या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणी योजनेचे ₹४५००, कारण काय?