Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचा मिळून तब्बल ३ हजार रुपयांचा हप्ता एकाच वेळी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महागाईच्या काळात घरखर्च सांभाळणाऱ्या, मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या आणि रोजच्या गरजांसाठी झगडणाऱ्या महिलांसाठी हा निधी मोठा आधार ठरणार आहे. Ladki Bahin Yojana
मंत्री गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मकरसंक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती दिली आहे. या घोषणेनंतर राज्यभरात महिलांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळत असलं, तरी दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण याच काळात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत मकरसंक्रांतीसारख्या सणाच्या दिवशी निधी वाटप करणं म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप घेत सरकारवर टीकेची झोड उठवली असून, निधी वितरणाचा वेळ संशयास्पद असल्याचा आरोप केला जात आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून मात्र हा निधी आधीच मंजूर असून त्याचा निवडणुकांशी काहीही संबंध नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ चा हप्ता डिसेंबरच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यावर जमा झाला होता. आता डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात एकाच वेळी ३ हजार रुपये जमा होणार आहेत. घरखर्च, सणासुदीचा खर्च, मुलांची शाळा-कॉलेजची फी किंवा दैनंदिन गरजांसाठी हा निधी उपयोगी ठरणार असल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांकडून व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना विशेषतः महत्त्वाची ठरली आहे. अनेक ठिकाणी महिलांनी या पैशांतून घरगुती गरजा भागवण्यासोबतच छोट्या बचतीलाही सुरुवात केली आहे. त्यामुळे निधी वेळेवर मिळणं महिलांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर हा निधी प्रत्यक्षात मकरसंक्रांतीला जमा होतो का, याकडे आता सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारकडून अधिकृत आदेश आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय राहते, यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आपल्या खात्यात जमा होणाऱ्या ३ हजार रुपयांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हे पण वाचा : महिलांची टेन्शन वाढवणारी बातमी! या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणी योजनेचे ₹४५००, कारण काय?
ग्रामीण भागातील गरिब गरजू महिलांना केवायसी समजत नाही के वाय सी करणारे करताना चुकीची करतात त्यामुळे त्यांच अनुदान आलं नाही त्या मुळे आता मात्र याला गरीब गरजू महिलांना बळी पळाव लागल आहे सुरुवातीला कोणत्याही जाचकअटी टाकल्या नव्हत्या लाडक्या बहिणीमुळे त्यांची पोळी भाजली आणि सत्तेत बसले आणि अनेक निकष टाकले त्यामुळे गरीब गरजू महिलांना बडी पळाव लागले. त्यामुळे प्रवीण महिलाचा गाव वाईस सर्वेक्षण करून अनुदान पाठवण्याची कृपा करावी ही विनंती.