Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांच्या आयुष्यात थोडा आधार, थोडी शाश्वती देणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट बँक खात्यात १५०० रुपये देणारी ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील महिलावर्गात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. घरखर्च, औषधपाणी, मुलांचं शिक्षण किंवा छोट्या गरजांसाठी मिळणारा हा पैसा अनेक महिलांसाठी मोठा आधार ठरला आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकही मान्य करत आहेत.
निवडणूक प्रचाराच्या काळात महायुतीतील काही नेत्यांनी या योजनेचा सन्मान निधी वाढवून १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्यात येईल, अशी जाहीर घोषणा केली होती. त्या घोषणेमुळे लाडक्या बहिणींमध्ये मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटून गेला असतानाही अद्याप निधीवाढीचा ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाची भावना निर्माण झाली आहे. “निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण होतील का?” असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. Ladki Bahin Yojana
दरम्यान, या योजनेत अपात्र महिलाही लाभ घेत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारने कठोर पावलं उचलली. पात्रता नसलेल्या महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली आणि या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली. आता फक्त ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर लाभार्थी महिलांची नावं वगळण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “ही योजना हळूहळू बंद करण्याचा डाव आहे,” असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच्या मनात भीतीचं सावट निर्माण झालं होतं.
याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा देणारी ठाम भूमिका जाहीर केली आहे. अमरावतीतील प्रचारसभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत चमत्कार दाखवला आहे. मी स्वतः गरिबी पाहिली आहे, काटकसर काय असते ते अनुभवलं आहे. काही लोक ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले, खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण अशा लोकांना लाडक्या बहिणींनी जोडा हाणला आहे. कोणीही माईका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पाडू शकत नाही.”
एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेनंतर लाडक्या बहिणींमध्ये नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. योजना बंद होणार नाही, हा सरकारचा स्पष्ट संदेश मिळाल्यामुळे अनेक महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र सन्मान निधी वाढीबाबत अजूनही ठोस निर्णय कधी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत दिलेल्या आश्वासनांवर सरकार कितपत उतरते, हे येत्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी फक्त आर्थिक मदत नाही, तर त्यांच्या स्वाभिमानाची आणि सुरक्षिततेची हमी बनून राहिली आहे.