Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी आधारवड ठरली असली, तरी सध्या या योजनेभोवती नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोव्हेंबर महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता उशिराने खात्यात जमा झाल्यानंतर महिलांना थोडासा दिलासा मिळाला खरा, मात्र आता सर्वांच्याच नजरा डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागल्या आहेत. “नोव्हेंबरचे पैसे आले, पण डिसेंबरचं काय?” हा प्रश्न आज प्रत्येक लाडक्या बहिणीच्या ओठांवर आहे.
राज्यात सुमारे २.५ कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. अनेक महिलांनी आठवड्यानुवर आठवडे बँक खात्याची पासबुकं तपासली, मोबाईलवर मेसेजची वाट पाहिली. अखेर नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, पण तोही अपेक्षेपेक्षा खूप उशिरा. त्यामुळे सरकारने सांगितलेली ‘नियमित मदत’ ही फक्त कागदावरच राहतेय का, असा सवाल आता महिलांकडून थेट विचारला जात आहे. Ladki Bahin Yojana Update
विशेष म्हणजे १५ जानेवारी रोजी होणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची ठरत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी महायुतीला मोठा कौल दिला होता. लाडकी बहिन योजनेमुळे महिलांचा सरकारवर विश्वास वाढला होता. पुणे, नाशिक, ठाणे, सोलापूर आणि नागपूर या जिल्ह्यांत महिलांच्या मतदानात सहा टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे आकडेही समोर आले होते. मात्र आता हप्त्यांमधील विलंबामुळे हाच विश्वास डळमळीत होत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील एका महिला लाभार्थीने सांगितले की, “नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती. सरकारकडून पैसे नियमित मिळतील असे सांगण्यात आले होते. पण नोव्हेंबरचाही हप्ता खूप उशिरा आला. आता डिसेंबरबाबत कुणी काहीच सांगत नाही.” अशा प्रतिक्रिया केवळ एक महिलांची नसून, तर राज्यभरातील सर्व लाभार्थी महिलांकडून येत आहेत.
दरम्यान, सत्ताधारी महायुतीतील नेतेही खासगी चर्चेत अडचणी मान्य करत आहेत. प्रचारादरम्यान महिलांकडून थेट हप्त्याबाबत प्रश्न विचारले जात असल्याने उत्तर देणे कठीण जात असल्याचे काही नेत्यांनी कबूल केले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नोव्हेंबरचा हप्ता जरी जारी झाला असला, तरी डिसेंबरचा हप्ता अद्याप वित्त विभागाच्या मंजुरीवर अवलंबून आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने निवडणुकीपूर्वी ही मंजुरी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले जात आहेत.
याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळेच लाडकी बहिन योजनेचे हप्ते रखडत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. “महिलांच्या नावाने योजना जाहीर केल्या, पण वेळेवर पैसे देण्याची तयारी नाही,” अशी टीका उघडपणे केली जात आहे.
लाडकी बहिन योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, ती महिलांच्या सन्मानाशी, सुरक्षिततेशी आणि त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेली आहे. त्यामुळे हप्ता उशिरा मिळाल्यास त्याचा थेट परिणाम स्वयंपाकघरावर, घरखर्चावर आणि महिलांच्या मानसिकतेवर होतो. “योजना चांगली आहे, पण पैसे वेळेवर मिळाले तरच ती उपयोगाची,” अशी भावना आता सर्वसामान्य महिलांमध्ये दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होईल का, याकडे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्या आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत महिलांचा हा साधा पण महत्त्वाचा प्रश्न सरकार कसा सोडवते, यावरच पुढील राजकीय गणित ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.