LPG Gas Cylinder Price: नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येक घरात एक नवी आशा, नवी अपेक्षा जन्माला येते. मागील काही वर्षांपासून महागाईने सर्वसामान्य कुटुंबांचा श्वास कोंडला होता. विशेषतः गृहिणींसाठी स्वयंपाकघर चालवणं म्हणजे दर महिन्याचं गणित जुळवण्याचं मोठं आव्हान बनलं होतं. पण २०२६ च्या नव्या वर्षाची पहिली सकाळ अनेक कुटुंबांसाठी दिलासा घेऊन येण्याची शक्यता आहे.
१ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत प्रति युनिट २ ते ३ रुपयांनी कपात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कपात फक्त वाहनधारकांसाठीच नाही, तर अप्रत्यक्षपणे घरगुती बजेटसाठीही महत्त्वाची ठरणार आहे. कारण सीएनजी-पीएनजी स्वस्त झाल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या दरातही घट होण्याची आशा आता बळावली आहे. LPG Gas Cylinder Price
सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. मागील अनेक महिन्यांपासून घरगुती १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ९ मार्च २०२४ पासून दर ‘जैसे थे’ आहेत. मात्र, याच काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळाली. त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांचाही नंबर लागेल का, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
सध्या दिल्लीत विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे ८०३ रुपये आहे. कोलकातामध्ये ती ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये तर चेन्नईमध्ये ८६८.६० रुपये आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र दरवर्षी ९ सिलिंडरसाठी ३०० रुपयांची सबसिडी मिळते, त्यामुळे त्यांच्यासाठी सिलिंडरची किंमत साधारण ५०३ रुपयांपर्यंत येते. ग्रामीण आणि गरीब कुटुंबांसाठी ही मदत आजही मोठा आधार ठरते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी घसरण ही सर्वात महत्त्वाची बाब ठरत आहे. सध्या कच्च्या तेलाचा दर सुमारे ६० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे, जो गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी पातळी मानली जाते. वाढलेला पुरवठा आणि स्थिर मागणी यामुळे हे दर घसरले आहेत. या वर्षातच कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल २१ टक्क्यांची घट झाली आहे.
कच्च्या तेलापासूनच पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीसारखी उत्पादने तयार होतात. तेल शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतूनच एलपीजीसाठी लागणारे गॅस तयार होतात. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने रिफायनरीजचा खर्च कमी झाला आहे आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
म्हणूनच १ जानेवारीपासून केवळ वाहनांच्या इंधनातच नव्हे, तर स्वयंपाकघराच्या खर्चातही थोडीशी उसंत मिळण्याची आशा आहे. महिन्याअखेरीस सिलिंडर भरण्याचा विचार करताना जे टेन्शन येतं, ते जर थोडं जरी कमी झालं, तरी गृहिणींसाठी तो मोठा दिलासा ठरेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाईचा भार थोडा हलका झाला, तर घराघरात खरंच नव्या वर्षाचं स्वागत हसऱ्या चेहऱ्याने होईल, यात शंका नाही.