Maharashtra Expressway : राज्यातील दळणवळण व्यवस्थेत गेल्या काही वर्षांत मोठा बदल झालेला सर्वांनाच जाणवतोय. नवनवीन महामार्ग, चौपदरी रस्ते, बायपास यामुळे प्रवास सुलभ झाला असला, तरी अजूनही काही भाग असे आहेत जिथे नागरिकांना फेऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो. जळगाव जिल्ह्यातून मध्य प्रदेशातील इंदोरकडे जाणाऱ्या प्रवासाचं चित्रही असंच आहे. त्यामुळे जळगाव ते इंदोर थेट जोडणाऱ्या शॉर्टकट रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असून, आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. Maharashtra Expressway
सध्या जळगावहून इंदोरला जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग उपलब्ध आहेत. एक रावेर–बऱ्हाणपूर मार्गे आणि दुसरा चोपडा ते शेंदवा मार्गे जाणारा. मात्र या दोन्ही मार्गांनी प्रवास करताना वाहनधारकांना मोठा फेरा मारावा लागतो. वेळ जास्त लागतो, इंधन खर्च वाढतो आणि प्रवासही कंटाळवाणा होतो. यामुळे जळगाव ते इंदोर दरम्यान थेट आणि कमी अंतराचा शॉर्टकट मार्ग असावा, अशी अपेक्षा नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांकडून सातत्याने व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर किनगाव–लंगडा आंबा–सिरवेल–खरगोन मार्गे थेट इंदोरला जोडणाऱ्या नव्या रस्त्याचा पर्याय प्रशासनाच्या पातळीवर अनेक वर्षांपूर्वी पुढे आला होता. हा रस्ता तयार झाला, तर जळगाव ते इंदोरचा प्रवास लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. वेळेची बचत होईल, इंधनाचा खर्च कमी होईल आणि जळगाव जिल्ह्याच्या व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र प्रत्यक्षात हा रस्ता आजही केवळ कागदावरच असल्याचं चित्र दिसतंय. अनेक वर्षांपासून प्रस्ताव मंजूर आहे, राज्यमार्गाचा आराखडाही तयार करण्यात आला होता आणि या रस्त्याला १८६ क्रमांक देण्यात आल्याची नोंद आहे. तरीसुद्धा प्रत्यक्ष काम मात्र सुरू झालेलं नाही. त्यामुळे ‘हा रस्ता कधी होणार?’ हा प्रश्न आजही जळगावकरांच्या मनात कायम आहे.
प्रस्तावित मार्गानुसार जळगाव–ममुराबाद–विदगाव–डांभूर्णी–किनगाव–वाघझिरा–लंगडा आंबा असा हा रूट असणार आहे. सध्या लंगडा आंबा पर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी कच्च्या अवस्थेत आहे. मात्र लंगडा आंबा ते सिरवेल दरम्यानचा रस्ता आधीच तयार असून, दोन्ही राज्यांच्या सीमेवर केवळ एका पुलाचं बांधकाम करायचं बाकी आहे. जळगाव जिल्ह्यातील किनगाव ते वाघझिरा हा रस्ता देखील तयार झालेला आहे, पण वाघझिरा ते लंगडा आंबा हा महत्त्वाचा टप्पा अद्याप विकसित करावा लागणार आहे.
हा शॉर्टकट रस्ता प्रत्यक्षात आला, तर जळगाव, चोपडा, यावल, रावेरसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होणार आहे. इंदोरसारख्या मोठ्या शहराशी थेट संपर्क वाढल्याने व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. त्यामुळे हा प्रस्ताव आता तरी मार्गी लागावा, अशी जोरदार अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकार आणि प्रशासन या दिशेने ठोस निर्णय कधी घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हे पण वाचा : महाराष्ट्रात लवकरच मोठा महामार्ग होणार! केंद्र सरकारची मंजुरी पहा कसा असणार रूट