Maharashtra Expressway News: उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी घडामोड अलीकडेच घडली आहे. नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी प्रवेश-नियंत्रित कॉरिडॉरला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवा वेग मिळणार आहे. हा कॉरिडॉर थेट दिल्ली–मुंबई एक्स्प्रेस-वे, धुळे–नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६०) तसेच गुजरातकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांशी जोडला जाणार असल्याने धुळे जिल्हा राष्ट्रीय महामार्ग जाळ्याशी अधिक मजबूतपणे जोडला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. ‘बांधा–वापरा–हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर उभारण्यात येणारा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहा पदरी रस्ते प्रकल्प असून त्याची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १९ हजार १४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू आहे.
धुळे जिल्ह्यासाठी काय बदलणार?
या कॉरिडॉरची नाशिक येथे एनएच-६० आणि दिल्ली–मुंबई एक्स्प्रेस-वे यांच्याशी थेट जोडणी होणार आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अप्रत्यक्षपणे देशातील सर्वात महत्त्वाच्या महामार्गांशी जोडली जाणार आहे. सध्या धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या एनएच-५२ (धुळे–सोलापूर–विजापूर मार्ग) तसेच एनएच-४८ मार्गे गुजरातकडे जाणारी वाहतूक वेळखाऊ आणि खर्चिक ठरते. मात्र नव्या सहा पदरी कॉरिडॉरमुळे हा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि स्वस्त होणार आहे.
धुळे एमआयडीसी, स्थानिक उद्योग, व्यापारी, वाहतूकदार तसेच शेतकऱ्यांसाठी हा बदल अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शेतीमाल, औद्योगिक कच्चा माल आणि तयार माल बंदरांपर्यंत पोहोचवताना लागणारा वेळ आणि इंधन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पश्चिम ते दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा
हा सहा पदरी कॉरिडॉर सुरत–चेन्नई जलदगती महामार्गाचा महत्त्वाचा भाग आहे. नाशिकपासून सुरू होणारा हा मार्ग अहिल्यानगर (अहमदनगर), धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून पुढे अक्कलकोटमार्गे आंध्र प्रदेशातील करनूलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे पश्चिम भारतातील औद्योगिक केंद्रे थेट दक्षिण भारताशी जोडली जाणार असून देशातील औद्योगिक, व्यापारी आणि बंदराशी संबंधित वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
सध्या चेन्नई बंदरापासून करनूलपर्यंत सुमारे ७०० किलोमीटर लांबीचे चार पदरी रस्ते प्रकल्प सुरू आहेत. त्यांना जोडणारा हा सहा पदरी कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पूर्व–पश्चिम औद्योगिक वाहतुकीचा एक मजबूत आणि अखंड मार्ग तयार होणार आहे. Maharashtra Expressway News
सुरक्षित, वेगवान आणि आधुनिक महामार्ग
हा मार्ग पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित असून क्लोज टोल प्रणालीवर आधारित असेल. सरासरी वाहनगती सुमारे ६० किलोमीटर प्रतितास तर कमाल गती १०० किलोमीटर प्रतितास ठेवण्यात येणार आहे. आधुनिक अभियांत्रिकी रचना, सुरक्षिततेच्या सुविधा आणि नियंत्रित प्रवेशामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.
राष्ट्रीय ‘गतिशक्ती मास्टर प्लॅन’ अंतर्गत उभारण्यात येणारा हा प्रकल्प राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे. नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूरसोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला या प्रकल्पामुळे नवे बळ मिळणार आहे.
रस्ता म्हणजे फक्त दगड-डांबर नसतो, तर तो संधींचा, रोजगाराचा आणि विकासाचा मार्ग असतो. हा सहा पदरी कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्हा केवळ नकाशावरच नाही, तर आर्थिक आणि औद्योगिकदृष्ट्याही देशाच्या मुख्य प्रवाहात अधिक ठळकपणे दिसू लागेल, हे नक्की.