Maharashtra Weather Update | काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडी अक्षरशः अंगात शिरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पहाटेच्या वेळेत घराबाहेर पडणं कठीण झालं असून थंडगार वाऱ्यांनी गारठा आणखी वाढवला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असून तिथूनच शीतलहरी महाराष्ट्रात दाखल होत आहेत. त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीलाच थंडीने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली असून मध्य महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. डिसेंबर महिना संपूर्णपणे कमी-अधिक थंडीचाच राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या भागांमध्ये तापमान झपाट्याने घसरत आहे. उत्तर भारतात वाढलेली थंडी आता महाराष्ट्रातही परिणाम दाखवत असून अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. परभणीमध्ये 6.9 अंश सेल्सिअस, धुळ्यात 6.1 अंश, निफाडमध्ये 6.3 अंश तर जळगावमध्ये 7 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. नाशिक, पुणे आणि मालेगाव येथेही तापमान 9 अंशांच्या आसपास घसरले आहे. विदर्भात भंडारा आणि गोंदिया येथे 10 अंशांपर्यंत तापमान खाली आलं आहे.
या थंडीचा सर्वाधिक फटका मध्य महाराष्ट्राला बसत असून आहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे येथे थंडीच्या लाटेचा थेट इशारा देण्यात आला आहे. यासोबतच नाशिक, आहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या हिमवर्षेमुळे उत्तरेकडून येणारे बोचरे वारे नाशिकच्या निफाड तालुक्यासह आसपासच्या भागात गारठा वाढवत आहेत.
सलग सहाव्या दिवशी निफाड तालुक्यात किमान तापमान 5 ते 6 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं चित्र आहे. रुई येथे 5.3 अंश तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीत कांदा उत्पादक शेतकरी पहाटे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येताना दिसत आहेत. थंडीपासून बचावासाठी शेतकरी शेकोट्यांचा आधार घेत असून हात गोठवणाऱ्या थंडीतही त्यांची रोजची धडपड सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता असून राज्यातील जनतेला अधिक सावध राहावं लागणार आहे. पहाटेची थंडी, बोचरे वारे आणि घसरलेला पारा यामुळे सामान्य माणसापासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच या गारठ्याचा सामना करावा लागत आहे. डिसेंबरचा हा गारठा अजून किती दिवस टिकणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.