लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही केवळ योजना न राहता आज लाखो महिलांच्या आयुष्याचा आधार बनली आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात मिळत असल्याने घरखर्चाला मोठा दिलासा मिळतोय. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी सुरू झालेल्या या योजनेचा राजकीय परिणामही स्पष्टपणे दिसून आला होता.

महायुती सरकारने निवडणुकीच्या काळातच “सत्तेत पुन्हा आलो तर लाडक्या बहिणींचा सन्मान निधी २१०० रुपये करू” असे आश्वासन दिले होते. मात्र सरकार स्थापन झाल्यानंतरही या निर्णयावर शिक्कामोर्तब न झाल्याने महिलांमध्ये संभ्रम होता. अशातच आता नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वक्तव्य लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक ठरलं आहे.

नगर परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने मोठं यश मिळवलं. तब्बल २८८ पैकी २१४ नगराध्यक्षपदांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर राहिला. शिंदे गटाचे ५७ उमेदवार विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. Mazi Ladki Bahin Yojana

या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी थेट लाडक्या बहिणींचा उल्लेख करत भावना व्यक्त केल्या. “शिवसेनेच्या इतिहासात एवढे नगराध्यक्ष कधीच निवडून आले नव्हते. यामागे कार्यकर्त्यांचे कष्ट आणि लाडक्या बहिणींचा पाठिंबा आहे,” असं ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, आरोग्याच्या विविध योजना यांचा उल्लेख करत समाधान व्यक्त केलं.

शिंदे पुढे म्हणाले, “माझी आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. अनेकांनी या योजनेला विरोध केला, अडथळे आणले. पण आम्ही ते सगळे अडथळे दूर करून योजना सुरू ठेवली. कोणताही माईचा लाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार म्हणजे देणारच. योग्य वेळी सन्मान निधीत वाढ केली जाईल.”

एकनाथ शिंदेंच्या या स्पष्ट शब्दांमुळे लाडक्या बहिणींमध्ये पुन्हा एकदा आशेचं वातावरण निर्माण झालं आहे. महागाईच्या काळात दरमहा मिळणारी ही रक्कम अनेक घरांसाठी आधार ठरत आहे. आता २१०० रुपयांचा निर्णय केव्हा प्रत्यक्षात येतो, याकडे राज्यातील लाखो महिलांचं लक्ष लागून राहिलं आहे. ही योजना फक्त आर्थिक मदत नाही, तर महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि सुरक्षित भवितव्याचा विश्वास बनत चालली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा…”

Leave a Comment