शेतकऱ्यांनो, ८ व्या हप्त्यापूर्वी मोठं संकट! याद्यांमधून लाखो नावे कट; तुमचा हप्ता रखडणार की मिळणार? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari 8th Installment |महाराष्ट्रातील लाखो बळीराजा सध्या एकाच प्रश्नाचे उत्तर शोधतोय – ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चा आठवा हप्ता कधी जमा होणार? केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता खात्यात पडून महिना उलटला, पण राज्य सरकारच्या दोन हजारांची अद्याप प्रतीक्षाच आहे. पण आता या प्रतीक्षेसोबतच शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी समोर आली आहे. यावेळेस हप्ता मिळण्यापूर्वीच राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे यादीतून कापली जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आचारसंहितेचा ‘खो’ आणि हप्त्याची तारीख

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यामुळे सध्या आदर्श आचारसंहिता लागू आहे. सरकारी तिजोरीतून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यावर सध्या निर्बंध आले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांमुळेच राज्य सरकारने आठवा हप्ता अद्याप थांबवून धरला आहे. निवडणुकांचे वारे शांत झाल्यानंतरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या पदरात पडेल, असा अंदाज आहे. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही ‘फिक्स’ तारीख जाहीर न केल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे.

लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट – काय आहे कारण?

सर्वात चिंतेची बाब म्हणजे, यावेळी कृषी विभागाने छाननीची तलवार उपसली आहे. पीएम किसानच्या गेल्या हप्त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या ९६ लाखांवरून थेट ९१ लाखांवर आली होती. आता राज्याच्या योजनेतही ४ ते ५ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं जाण्याची चिन्हे आहेत.

​तपासणीमध्ये काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:

मृत लाभार्थी: सुमारे २८ हजार मृत व्यक्तींच्या नावे अद्याप हप्ते उचलले जात होते, ही नावे आता कायमची हटवण्यात आली आहेत.

दुहेरी लाभ: एकाच जमिनीच्या उताऱ्यावर दोन-दोन जण पैसे लाटत होते, अशा ३५ हजार जणांना दणका बसला आहे.

रेशनकार्डचा नियम: आता कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला हा लाभ मिळेल, असा नियम कडक करण्यात आला आहे.

आयकर आणि नोकरी: जे शेतकरी आयकर भरतात किंवा सरकारी/निमशासकीय नोकरीत आहेत, त्यांचे नावही यादीतून बाद केले जात आहे.

गरजू शेतकऱ्यांचे काय?

कृषी विभागाच्या मते, ही ‘साफसफाई’ केवळ खऱ्या आणि गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहोचावा यासाठी केली जात आहे. जर तुमचे कागदपत्रे नीट असतील आणि तुम्ही नियमात बसत असाल, तर तुम्हाला हप्ता नक्की मिळेल. पण सध्या तरी आचारसंहितेचा अडथळा आणि प्रशासकीय छाननी यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

Leave a Comment