नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार? आली मोठी अपेक्षा समोर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana: राज्यातील शेतकरी बांधव सध्या एका गोष्टीकडे डोळे लावून बसले आहेत आणि तो प्रश्न आता शेतकरी शेताशेतात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे “नमो शेतकरी महासन्मान (Namo Shetkari Yojana) निधी योजनेचा हप्ता नक्की कधी मिळणार?” कारण केंद्र सरकारचा पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, पण त्याच्यासोबत येणारा राज्य सरकारचा नमो शेतकरीचा हप्ता मात्र अजूनही खात्यात दिसलेला नाही. दोन महिने उलटून गेले तरीही खात्यात पैसे न दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढताना दिसते आहे.

साधारणपणे आतापर्यंतची पद्धत पाहिली तर पीएम किसानचा हप्ता आला की काही दिवसांतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असे. त्यामुळे यावेळीही शेतकऱ्यांना तशीच अपेक्षा होती. मात्र यंदा चित्र वेगळेच दिसत आहे. पीएम किसानचे पैसे येऊन तब्बल दोन महिने होत आले, तरी राज्य सरकारकडून कोणतीही ठोस हालचाल किंवा अधिकृत घोषणा दिसत नाही. यामुळे निधी नक्की अडकलाय कुठे? राज्य सरकारकडे पैसे नाहीत का? की निवडणुकांमुळे मुद्दाम विलंब केला जातोय? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसले आहेत.

सध्या काही भागांत नगरपालिका निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे, मात्र नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी ग्रामीण भागातील असल्याने या आचारसंहितेचा थेट अडथळा येत नाही, हे वास्तव आहे. पण खरी चिंता पुढच्या टप्प्याची आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. जर त्या आधी सरकारने नमो शेतकरी योजनेचा जीआर काढला नाही आणि निधी वितरण सुरू केले नाही, तर एकदा आचारसंहिता लागल्यानंतर हा हप्ता आणखी लांबणीवर पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यात पैसे मिळण्याची अपेक्षाही धूसर होऊ शकते.

आज शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली तर अडचणींचा डोंगर उभा आहे. अतिवृष्टीची नुकसानभरपाई अजून अनेक ठिकाणी अपूर्ण आहे कृषी पंपांची डीबीटी अनुदाने थकीत आहेत बाजारभाव हमीभावाच्या आसपासही फिरकत नाहीत आणि त्यात आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल्यामुळे बळीराजाची कसरत आणखी वाढली आहे. प्रशासनाकडून यावर स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याने संभ्रम अधिकच वाढतो आहे.

शेतकरी बांधवांसाठी हा केवळ हप्ता नाही, तर बीबियाणे, खत, घरखर्च आणि कर्जाच्या हप्त्यांची गणितं याच पैशांवर अवलंबून असतात. त्यामुळे हा निधी वेळेवर मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता चेंडू पूर्णपणे सरकारच्या कोर्टात आहे. आचारसंहितेचा बाऊ न करता, तांत्रिक कारणांचा आधार न घेता राज्य सरकारने तातडीने नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा हीच सध्या बळीराजाची एकमुखी अपेक्षा आहे. शेतकरी अजून किती दिवस वाट पाहणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा : लवकरच, खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार?

Leave a Comment