Namo Shetkari Yojana 8th Installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार, हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात घोळत आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता आधीच खात्यात जमा झाला असतानाही राज्य सरकारकडून मिळणारी अतिरिक्त आर्थिक मदत अद्याप न आल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढली आहे. शेतीसाठी लागणारा खर्च, खत-बियाण्यांचे दर आणि घरखर्च यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता महत्त्वाचा मानला जातो.
राज्यात सध्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे कोणतीही आर्थिक योजना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करताना शासनाला निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करावे लागत आहे. याच कारणामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सध्या रोखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हा हप्ता वितरित केला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात असली तरी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जानेवारीपेक्षा फेब्रुवारीत हप्ता मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या हप्त्यापूर्वीच कृषी विभागाकडून लाभार्थ्यांची सखोल छाननी सुरू करण्यात आली असून, यामुळे अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जात आहेत. यंदा निकष अधिक कठोर करण्यात आल्याने पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पीएम किसान योजनेच्या मागील हप्त्यावेळी जशी लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती, त्याच धर्तीवर आता नमो शेतकरी योजनेतही सुमारे चार ते पाच लाख शेतकरी अपात्र ठरू शकतात, अशी माहिती पुढे येत आहे.
छाननीदरम्यान अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. यादीत सुमारे अठ्ठावीस हजार मृत लाभार्थ्यांची नावे आढळून आली असून ती तात्काळ काढून टाकण्यात आली आहेत. तसेच एकाच जमिनीवर दोन वेळा लाभ घेतल्याचे आढळलेल्या सुमारे पंचवीस ते पंचतीस हजार लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. याशिवाय, एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य योजनेचा लाभ घेत असल्यास आता केवळ एका सदस्यालाच हा लाभ मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयकर भरणारे शेतकरी तसेच शासकीय आणि निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले लाभार्थीही या योजनेतून वगळण्यात आले आहेत. या निर्णयामुळे अनेक शेतकरी अचानक अपात्र ठरत असून, आपल्याला पुढील हप्ता मिळेल की नाही, याबाबत मोठी साशंकता निर्माण झाली आहे. काही शेतकरी कार्यालयांचे फेरे मारत असून, तर काहीजण आपली कागदपत्रे पुन्हा तपासून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. Namo Shetkari Yojana 8th Installment
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया केवळ खऱ्या, गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी राबवली जात आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या आणि कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी नसलेल्या शेतकऱ्यांना आठवा हप्ता नक्कीच मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांना संयम बाळगावा लागणार आहे.
दरम्यान, नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता नेमका कधी जमा होणार, याबाबत अधिकृत घोषणा कधी होते, याकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दोन हजार रुपयांचा हा हप्ता जरी छोटा वाटत असला, तरी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यासाठी तो मोठा आधार ठरतो, हे वास्तव आजही तितकंच खरं आहे.