इतिहास घडतोय नाशिकमध्ये! शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारणीची घोषणा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Onion Bhavan | राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात जगातील पहिले आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय कांदा भवन’ उभारण्याची ऐतिहासिक घोषणा केली.

हे राष्ट्रीय कांदा भवन सिन्नर तालुक्यातील जयगाव येथे दोन एकर जागेवर उभारले जाणार असून, भविष्यात गरजेनुसार त्याचा विस्तार केला जाईल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या देणग्यांमधून उभारली जाणार आहे.

यावेळी बोलताना दिघोळे म्हणाले, “आतापर्यंत कांदा शेती अनिश्चित, तोट्याची आणि कर्जबाजारी होती. मात्र राष्ट्रीय कांदा भवन उभे राहिल्यानंतर कांदा शेती विश्वासार्ह, शाश्वत, फायदेशीर आणि सुरक्षित बनेल.”

शेतकऱ्यांच्या सहभागातून धोरणे

भारत जगातील आघाडीचा कांदा उत्पादक देश असतानाही आयात-निर्यात निर्बंध, नाफेड व एनसीसीएफचा बफर स्टॉक, तसेच किंमत नियंत्रणाचे निर्णय शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली.

राष्ट्रीय कांदा भवनाच्या स्थापनेनंतर हे सर्व निर्णय शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या हितासाठी घेतले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संशोधन, बाजार नियंत्रण आणि थेट विक्री

राष्ट्रीय कांदा भवनातून —

कांदा बियाणे संशोधन व गुणवत्ता नियंत्रण

वनस्पती पोषण व शास्त्रीय खत-औषध नियोजन

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सामूहिक खरेदी

पिकाचे संपूर्ण निरीक्षण

ही सर्व कामे कमी खर्चात आणि सामूहिक पद्धतीने केली जाणार आहेत. तसेच राज्य व देशातील सर्व बाजार समित्यांमधील कांद्याच्या विक्री व्यवहारांवरही या भवनातून नियंत्रण ठेवले जाईल.

दलालमुक्त व्यवस्था, शेतकरी–ग्राहक थेट संपर्क

राष्ट्रीय कांदा भवनाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट कांदा विक्री प्रणाली उभारली जाणार आहे. यामुळे सध्याची दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना शाश्वत नफा आणि ग्राहकांना परवडणाऱ्या व स्थिर किमतीत कांदा उपलब्ध होईल.

आधुनिक सुविधा आणि संघर्षाची तयारी

या भवनात देश-विदेशातून येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, निर्यातदार, अधिकारी, पत्रकार व तज्ज्ञांसाठी —

निवास व जेवण व्यवस्था

बैठक व परिषद कक्ष

इंटरनेट, संगणक सुविधा

कांदा चाचणी प्रयोगशाळा

अशा सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

“जर राज्य किंवा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात धोरणे आखली, तर राष्ट्रीय कांदा भवन गप्प बसणार नाही. संवादासोबतच गरज पडल्यास संघर्षही केला जाईल,” असा इशाराही दिघोळे यांनी दिला.

Leave a Comment