Onion Market Price: गेल्या अनेक महिन्यांपासून मातीमोल भावात विकल्या जाणाऱ्या कांद्याने अखेर थोडी उसंत घेतली आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांतच कांद्याच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ झाल्याने बाजारात पुन्हा हालचाल दिसू लागली आहे. बांगलादेश, श्रीलंका यांच्यासह दक्षिणेकडील राज्यांतून कांद्याला मागणी वाढल्याने ही दरवाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जात आहे.
एप्रिल महिन्यापासून बाजारात कांद्याचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली होती. सात ते आठ महिने कांद्याला अपेक्षित दर मिळत नव्हते. खर्च निघणंही मुश्किल झाल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मागणी कमी, आवक जास्त अशी स्थिती असल्याने कांद्याचे दर सतत दबावात होते. मात्र आता चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे.
जुन्या कांद्याचा साठा संपत चालला आहे. त्यातच मागणी वाढू लागल्याने घाऊक बाजारात दरांनी उसळी घेतली आहे. आठवड्याभरापूर्वी ज्या कांद्याला १० ते १५ रुपये किलो असा दर मिळत होता, त्याच कांद्याला आता प्रतवारीनुसार १८ ते २५ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) मार्केट यार्डात हे वाढलेले दर पाहायला मिळाले. Onion Market Price
यंदा पावसाने जरा जास्तच खेळ केला. लांबलेल्या पावसाचा फटका नवीन लाल कांद्याच्या लागवडीला बसला. साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होणारा नवीन कांद्याचा हंगाम यंदा उशिरा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या बाजारात केवळ जुन्या कांद्यावरच व्यवहार सुरू आहेत. अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा तसेच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर या भागांतून जुन्या कांद्याची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांत कांद्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, खानावळी, केटरिंग व्यवसायांकडून कांद्याची मागणी वाढते. नवीन कांदा अजून बाजारात आलेला नसल्याने सध्या मागणी आणि आवक यामधील तफावत दरवाढीस कारणीभूत ठरू शकते, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.
एकूणच, अनेक महिन्यांनंतर कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत थोडी आशा निर्माण केली आहे. मात्र ही दरवाढ टिकेल की पुन्हा कांदा घसरतो, हे पुढील काही आठवड्यांत स्पष्ट होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि ग्राहकांवरही जादा बोजा पडू नये, अशीच अपेक्षा सध्या सगळ्यांची आहे.