Panjab Dakh Havaman Andaj : नमस्कार शेतकरी बांधवांनो, सध्या पहाटेची थंडी, दिवसभर ढगाळ वातावरण आणि मोबाईलवर फिरणारे मेसेज पाहिले की मनात एकच प्रश्न उभा राहतो यंदा 1972 सारखा दुष्काळ तर पडणार नाही ना? मागच्या काही दिवसांत ही चर्चा इतकी वाढली आहे की अनेक शेतकरी पेरणी खत पुढचं नियोजन सगळंच थांबवून बसलेत. पण याच सगळ्या गोंधळावर हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी थेट शेतातून उभं राहून दिलेला खुलासा सध्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरतोय. Panjab Dakh Havaman Andaj
पंजाब डख सांगतात की सध्या महाराष्ट्रात जाणवणारी कडाक्याची थंडी ही ३ जानेवारीपर्यंत टिकेल. ही थंडी रब्बी पिकांसाठी विशेषतः हरभरा, गहू, कांदा यांसाठी अत्यंत पोषक आहे. अनेक भागांत हरभऱ्याला कळी धरायला हीच थंडी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या थंडीची भीती बाळगण्याचं कारण नाही उलट शेतकऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर वातावरणात थोडा बदल दिसेल. विदर्भ, मराठवाडा खानदेश उत्तर-दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण या भागांत आकाश अंशतः ढगाळ राहील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धोका नाही. ढग असतील धुके आणि धुई जाणवेल पण पावसाचा प्रश्न नाही. हेच ढगाळ वातावरण हरभऱ्याला फुलोऱ्यासाठी कलिंगड-खरबूज आणि उसाच्या वाढीसाठी चांगलं ठरणार आहे. द्राक्ष बागायतदारांनीही पावसाची धास्ती न घेता फक्त बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणाची काळजी घ्यावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आता सगळ्यात मोठा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न २०२६ मध्ये दुष्काळ पडणार का? यावर पंजाब डख यांनी अगदी ठाम शब्दांत सांगितलं आहे की, २०२६ मध्ये 1972 सारखा दुष्काळ अजिबात पडणार नाही. या भीतीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. याचं कारणही त्यांनी सोप्या शब्दांत समजावून सांगितलं. २०२५ मध्ये अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला. परभणीसारख्या भागात जिथे ६५०–७०० मिमी पाऊस अपेक्षित असतो, तिथे १३०० मिमीपर्यंत पाऊस झाला. सोलापुरात ३५० मिमी ऐवजी ८००–९०० मिमी पाऊस पडला. त्यामुळे पुढच्या वर्षी असाअतिवृष्टीसारखा पाऊस होणार नाही, पण सरासरी आणि वेळेवर पाऊस नक्कीच होईल. आणि सरासरी पाऊस म्हणजे दुष्काळ नाही, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला हवं.
डख सांगतात, मर्यादित पण योग्य वेळी पडणारा पाऊस हा पिकांसाठी जास्त फायदेशीर ठरतो. त्यामुळे २०२६ हे वर्ष अतिवृष्टीचं नाही, पण शेतकऱ्यांसाठी संतुलित आणि कामाचं वर्ष असणार आहे. सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या दुष्काळाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपलं नियोजन ठेवा, पिकांची निगा राखा आणि गरज नसताना भीती पसरवणाऱ्या मेसेजपासून दूर रहा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
थोडक्यात काय तर थंडी रब्बीसाठी चांगली आहे ढगाळ वातावरण उपयोगाचं आहे आणि २०२६ मध्ये दुष्काळाचं सावट नाही. निसर्ग आपली परीक्षा घेतोच, पण यंदा तो शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे, असा विश्वास पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. शेतकरी बांधवांनो, अफवांपेक्षा शास्त्रावर भरोसा ठेवा आणि बिनधास्त पुढचं नियोजन करा अडचणींचा काळ नाही, तर संधीचं वर्ष पुढे येतंय.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यम व पंजाबराव यांच्या अंदाजानुसार आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.)