Ration Card New Rule: रेशनकार्डवर अवलंबून असलेल्या कोट्यवधी कुटुंबांसाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. अनेक घरांमध्ये रेशनकार्ड हे केवळ कागदपत्र नसून, गरिबीशी चाललेली रोजची लढाई जिंकण्याचं एक साधन आहे. पण आता जर तुम्ही काही कारणाने रेशन दुकानातून धान्य उचलले नसेल, तर तुमचं रेशनकार्ड धोक्यात येऊ शकतं. केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) मोठा बदल करत नवा कठोर नियम लागू केला आहे, ज्याचा थेट परिणाम सर्व रेशनकार्डधारकांवर होणार आहे.
नेमकं काय घडलंय?
जुलै 2025 मध्ये केंद्र सरकारने “लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, 2025” अधिसूचित केला. या आदेशानुसार, सलग सहा महिने रेशन न उचलणाऱ्या कुटुंबांचं रेशनकार्ड ‘इनअॅक्टिव्ह’ केलं जाणार आहे. म्हणजेच, सहा महिने रेशन दुकानात गेलाच नाहीत, अंगठा लागला नाही, धान्य उचललं नाही. तर कार्ड आपोआप निष्क्रिय होईल.
सरकार इतकं कठोर का झालं?
सध्या देशात तब्बल २३ कोटींपेक्षा जास्त रेशनकार्ड अॅक्टिव्ह आहेत. यामध्ये बनावट कार्ड, दुहेरी नोंदी, स्थलांतर केलेले लाभार्थी आणि अपात्र लोकांची संख्या मोठी आहे. सरकारचा अंदाज आहे की या नव्या छाननीमुळे ७ ते १८ टक्के रेशनकार्ड रद्द होऊ शकतात. यामागचा उद्देश एकच – खऱ्या गरजू लोकांपर्यंतच सरकारी धान्य पोहोचावं. Ration Card New Rule
मोफत रेशन घेत नसाल तरी कारवाई होणार?
हो, हीच सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अनेकांना मोफत रेशन मिळतं. पण, “रेशन मोफत आहे म्हणून उचललं नाही” हा बहाणा आता चालणार नाही. जर मोफत रेशनसाठी पात्र असूनही तुम्ही सहा महिने धान्य उचललं नसेल, तरीही तुमचं कार्ड निष्क्रिय होऊ शकतं.
आता दर पाच वर्षांनी पात्रतेची तपासणी
आता रेशनकार्ड कायमचं एकदाच मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केलं आहे की प्रत्येक रेशनकार्डधारकाची पात्रता दर ५ वर्षांनी तपासली जाणार आहे. यामध्ये उत्पन्न, कुटुंबातील सदस्य, स्थलांतर, मृत्यू यासारख्या बाबी तपासल्या जातील.
मुलांचं e-KYC का गरजेचं?
रेशनकार्डवरील
- ५ वर्षांखालील मुलांचा आधार क्रमांक नोंदवणं बंधनकारक असेल.
- मूल पाच वर्षांचं झाल्यानंतर त्याचं e-KYC करणं आवश्यक राहील.
जर एका रेशनकार्डमध्ये दुहेरी नोंद आढळली, तर कार्ड ३ महिन्यांसाठी निलंबित केलं जाईल. आणि त्यानंतर KYC पूर्ण केल्यानंतरच अंतिम निर्णय होईल.
नवीन रेशनकार्ड मिळणंही आता सोपं नाही
यापुढे नवीन रेशनकार्ड देताना ‘प्रथम या, प्रथम मिळवा’ हे तत्त्व लागू होणार आहे. प्रत्येक राज्याला आपल्या अधिकृत पोर्टलवर वेटिंग लिस्ट जाहीर करणं बंधनकारक असेल. म्हणजेच, अर्ज केला तरी कार्ड लगेच मिळेलच असं नाही.
सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
जर तुमच्याकडे रेशनकार्ड असेल तर हे नक्की करा
- ✔ दर महिन्याला किंवा किमान सहा महिन्यांच्या आत रेशन उचला
- ✔ सर्व कुटुंबीयांचं आधार लिंकिंग आणि e-KYC पूर्ण ठेवा
- ✔ कार्डवरील नोंदी तपासा — नाव, वय, सदस्य संख्या
- ✔ स्थलांतर केलं असेल तर स्थानिक कार्यालयात माहिती द्या
रेशनकार्ड हे सरकारकडून मिळणारी भीक नाही, तर गरिबांसाठी दिलेला हक्क आहे.
पण हा हक्क टिकवायचा असेल, तर नियम पाळणं आता अत्यावश्यक झालं आहे. आज दुर्लक्ष केलं, तर उद्या रेशन दुकानात गेल्यावर “तुमचं कार्ड बंद आहे” हे ऐकावं लागू शकतं. त्यामुळे वेळेत जागं व्हा, नियम समजून घ्या आणि तुमचं रेशनकार्ड सुरक्षित ठेवा.