Ration card news : घरात रेशन कार्ड म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र. धान्य मिळवण्यासाठी असो, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो किंवा ओळखीचा पुरावा द्यायचा असो शिधापत्रिका कायम लागतेच. पण वर्षानुवर्षे वापरात राहिलेलं हे कागदी रेशन कार्ड पावसात भिजून फाटणं, अक्षरं पुसट होणं किंवा अचानक हरवणं, अशी अवस्था अनेक घरांत पाहायला मिळते. अशा वेळी स्वस्त धान्यासाठी दुकानात उभं राहिल्यावर किंवा एखाद्या सरकारी कामासाठी गेल्यावर मोठी अडचण निर्माण होते. Ration card news
मात्र आता या सगळ्या त्रासावर सरकारने सोपा आणि कायमचा उपाय दिला आहे. कागदी रेशन कार्डाला पर्याय म्हणून आता डिजिटल आणि PVC रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे कार्ड काढण्यासाठी ना कार्यालयाची वारी, ना एजंट, सगळं काम घरबसल्या मोबाईलवरच करता येतं.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘मेरा रेशन’ या अधिकृत मोबाईल अॅपमुळे शिधापत्रिकाधारकांना आपलं संपूर्ण रेशन कार्ड थेट मोबाईलमध्ये पाहता येतं. या अॅपमध्ये लॉग-इन केल्यानंतर कुटुंबप्रमुखाचं नाव, रेशन कार्ड क्रमांक, कुटुंबातील सदस्यांची यादी, सगळा तपशील एका क्लिकवर दिसतो. हेच डिजिटल रेशन कार्ड पुढे PVC म्हणजेच प्लास्टिक कार्ड बनवण्यासाठी वापरता येतं.
ई-रेशन कार्ड काढायचं कसं, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये ‘मेरा रेशन’ अॅप डाउनलोड करायचं. अॅप उघडल्यानंतर Beneficiary हा पर्याय निवडून रेशन कार्डशी लिंक असलेला आधार क्रमांक टाकायचा. कॅप्चा भरल्यानंतर ओटीपी येतो आणि काही सेकंदात लॉग-इन पूर्ण होतं. एकदा लॉग-इन झालं की स्क्रीनवरच तुमचं डिजिटल रेशन कार्ड दिसू लागतं. याच पानावर ई-रेशन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय दिलेला असतो. त्यावर क्लिक केल्यावर पीडीएफ स्वरूपात रेशन कार्ड मोबाईलमध्ये सेव्ह करता येतं. ही पीडीएफ प्रत शासकीय कामांसाठीही वैध मानली जाते. म्हणजे आता कागदी पुस्तक नसलं तरी काम अडणार नाही.
डिजिटल रेशन कार्डचं पुढचं पाऊल म्हणजे PVC रेशन कार्ड. एटीएम कार्डसारखं मजबूत, पाण्याला न खराब होणारं आणि खिशात सहज मावणारं हे कार्ड अनेकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. सध्या सरकारी अॅपवरून थेट PVC कार्ड ऑर्डर करता येत नसलं, तरी डाउनलोड केलेल्या पीडीएफच्या आधारे जवळच्या PVC कार्ड प्रिंटिंग केंद्रावर अल्प दरात हे कार्ड तयार करून मिळतं. काही ठिकाणी तर काही मिनिटांत कार्ड हातात दिलं जातं.
PVC रेशन कार्डमुळे फाटणं, हरवणं किंवा खराब होण्याची भीतीच राहत नाही. वारंवार रेशन दुकानात जाताना कार्ड सांभाळण्याचा ताण कमी होतो आणि सरकारी कामातही एक मजबूत ओळखपत्र हाताशी राहतं. त्यामुळे ज्यांचं रेशन पुस्तक आधीच खराब झालंय, किंवा ज्यांना पुढचा त्रास टाळायचा आहे, त्यांनी डिजिटल रेशन कार्ड काढून PVC कार्ड बनवणं हा आजच्या घडीला सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे.