Soybean Market : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटताना दिसत आहे. कारण दीर्घ काळानंतर सोयाबीन बाजारभावात स्पष्टपणे वाढ दिसून आली असून मराठवाड्यातील प्रमुख बाजारात प्रथमच ५ हजार रुपयांचा टप्पा पार झाला आहे.Soybean Marke
यावर्षीचा सोयाबीन हंगाम नेहमीप्रमाणे विजयादशमीनंतर सुरू झाला. सुरुवातीला बाजारात आवक वाढली, मात्र दर मात्र साडेचार हजारांच्या आसपासच अडकून पडले. उत्पादन खर्च, मजुरी, खत-औषधांचे वाढलेले दर पाहता हा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री न करता साठवणुकीचा मार्ग निवडला. आता विकून उपयोग नाही, थोडं थांबूया अशी मानसिकता गावागावात दिसून येत होती.
यंदा मान्सून काळात राज्यातील अनेक भागांत कमी दिवसांत मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह अनेक खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादन घटले, हातात येणारा माल कमी झाला, पण बाजारभाव मात्र वाढायला तयार नव्हते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अधिकच चिंतेत सापडले होते.
मात्र आता खुल्या बाजारातील चित्र बदलू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शुक्रवारी मराठवाड्यातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाल्याने बाजारात चांगलीच चर्चा रंगली. २६ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या लिलावात लातूर बाजारात सोयाबीनला कमाल ५,१०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ४,८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्याची नोंद राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली आहे.
हंगाम सुरू झाल्यापासून प्रथमच ५ हजार रुपयांचा टप्पा पार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील काही आठवड्यांपासून शेतकऱ्यांनी माल बाजारात कमी प्रमाणात आणल्याने आवक घटली आणि त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या संयमाचा आता बाजारात फायदा होताना दिसतोय.
जर मागील पाच दिवसांचा आढावा घेतला तर दररोज हळूहळू भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसते. २२ डिसेंबर रोजी सोयाबीनला कमाल ४,९१३ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. २३ डिसेंबरला हा भाव ४,९०० रुपयांवर स्थिर राहिला. २४ डिसेंबरला दर ४,९५० रुपयांपर्यंत पोहोचला, तर २५ डिसेंबरला पहिल्यांदाच ५,००० रुपयांचा टप्पा गाठला. अखेर २६ डिसेंबरला ५,१०० रुपयांचा उच्चांक नोंदवला गेला.
सध्या बाजारातील ही तेजी पाहता पुढील काही दिवसांत सोयाबीनच्या दरांमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शेतकऱ्यांनी बाजारातील रोजचे भाव पाहूनच निर्णय घ्यावा, असा सल्लाही जाणकारांकडून दिला जात आहे. तरीही इतक्या दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेल्या या दरवाढीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, एवढं मात्र नक्की.
हे पण वाचा | सोयाबीन बाजार भाव झाला मोठा बदल; आजचा सोयाबीन बाजार भाव पहा