Unseasonal rain : राज्यासह संपूर्ण देशात सध्या हवामानाचा खेळच सुरू आहे. कुठे पहाटे दंव साचतोय, तर कुठे ढग अचानक दाटून मुसळधार पावसाला सुरुवात होतेय. मॉन्सून जाऊन महिने उलटले असतानाही पावसाचं संकट काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. विशेष म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजीही काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून थंडीचा कडाका जाणवतोय. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे ग्रामीण भागात पहाटे गारठा वाढला आहे. शेतात काम करणारे मजूर, सकाळी लवकर उठणारे शेतकरी आणि रस्त्यावरचे हातावर पोट असणारे लोक थंडीने अक्षरशः कुडकुडताना दिसत आहेत. परभणी जिल्ह्यात तर राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून इथे पारा थेट 6.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. धुळे येथे 6.6 अंश, निफाडमध्ये 6.8 अंश तर यवतमाळ, अहिल्यानगर, गोंदिया आणि नागपूर भागात तापमान 9 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलं आहे. पुढील काही दिवस परभणी, निफाड आणि धुळे जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका असाच कायम राहण्याचा अंदाज आहे. Unseasonal rain
एकीकडे महाराष्ट्रात थंडी वाढत असताना, दुसरीकडे देशातील अनेक भागांमध्ये पावसाचं सावट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमी वाऱ्यांचा एक नवा प्रभाव सक्रिय झाला असून त्यामुळे हवामानात अचानक बदल जाणवू लागला आहे. विशेषतः उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वाढली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट आणि मुझफ्फराबाद भागात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. या भागांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री दाट ते अतिदाट धुक्याची शक्यता असून रस्ते वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. पूर्व उत्तर प्रदेशातही 1 जानेवारीपर्यंत धुकं कायम राहण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये 31 डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर अंदमान आणि निकोबार बेटांमध्येही वर्षाअखेरीस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एकाच वेळी थंडी, पाऊस, धुके आणि काही शहरांमध्ये वाढलेलं प्रदूषण या सगळ्यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसतोय. सर्दी-खोकला, ताप, श्वसनाचे त्रास वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हवामानातील या सततच्या बदलांमध्ये नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं तर, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश सज्ज होत असतानाच निसर्ग मात्र आपला वेगळाच इशारा देताना दिसतोय.
हे पण वाचा | डिसेंबर महिन्यात या तारखेला होणारा अवकाळी पाऊस पंजाबरावांचा इशारा